नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठल्यानंतर सुरु झालेली घसरण कायम आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात एक ते दोन वेळा वाढ झाली. इतर दिवशी सोने आणि चांदीचे दर घसरले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. 17 ऑक्टोबरला सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचले होते. तेव्हा पासून सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची घसरण झाली. तर, चांदीच्या दरात 21 हजार रुपयांची घसरण झाली आहे.
देशांतर्गत बाजारात शुक्रवारी सोन्याचे एका तोळ्याचे दर 120100 रुपयांवर आले आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा 17 ऑक्टोबरचा दर 130874 रुपयांवर होते. तेव्हापासून सोन्याचे दर 10774 रुपयांनी घसरले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 17 ऑक्टोबरला 5 डिसेंबरला संपणाऱ्या वायद्याचे 24 कॅरेट सोन्याचे दर 127008 रुपयांवर होते.
चांदीचे दर गेल्या 14 दिवसात 21000 रुपयांनी घसरले आहेत. आयबीजेएच्या वेबसाईटनुसार 17 ऑक्टोबरला एक किलो चांदीचा दर 169230 रुपयांवर होता. शुक्रवारी 7 नोव्हेंबरला चांदीचा दर 148275 रुपयांवर आला आहे. त्या हिशोबानं चांदीचा एका किलोचा दर 20955 रुपयांनी घसरला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा दर देखील घसरला आहे. 14 दिवसांपूर्वी चांदीच्या वायद्याचा दर 156604 रुपयांवर होता. त्यामध्ये 8815 रुपयांची घसरण झाली आहे. सोने आणि चांदीच्या वायद्याच्या दरांची तुलना केल्यास चांदी 170415 रुपयांवरुन 22626 रुपयांनी घसरली आहे. तर, सोन्याचे दर 11256 रुपयांनी घसरले आहेत.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर अपडेट करण्यात आलेले दर देशभर सारखेच असतात.सोन्याच्या दरावर 3 टक्के जीएसटी आकारला जातो. त्याशिवाय सोने आणि चांदीच्या दागिण्यांसाठी मेकिंग चार्जेस आकारले जातात.
2025 मध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत विविध देशांवर टॅरिफ लादलं. यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता निर्माण झाली. या अस्थिरतेमुळं गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीमध्ये गुंतवणुकीस प्राधान्य दिलं. याशिवाय 2025 मध्ये विविध देशांमध्ये संघर्ष वाढल्याचा परिणाम देखील बाजारांवर दिसून आला. अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीतील गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यामुळं सोने आणि चांदीतील गुंतवणूक वाढली आहे. 31 डिसेंबरला सोन्याचा दर 75000 रुपयांवर होता. 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 134000 रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र, त्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोने आणि चांदीच्या घसरणीनंतर देखील गुंतवणूकदारांना यंदा चांगला फायदा झाला आहे.
आणखी वाचा