Team India : 5 सामने-1 मालिका, सूर्यकुमार कॅप्टन, भारताची आगामी टी 20I मालिका केव्हा?
GH News November 08, 2025 10:11 PM

भारताने सूर्यकुमार यादव याच्या कॅप्टन्सीत टी 20i मालिका जिंकून ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजमधील पराभवाची परतफेड केली. भारताला शुबमन गिल याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-2 ने पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र भारताने 5 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकत कांगारुंचा हिशोब केला. मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी 20i सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्याआधी पहिला सामनाही पावसानेच जिंकला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने सलग 2 सामने जिंकून जोरदार कमबॅक केलं. त्यामुळे भारताकडे ब्रिस्बेनमधील द गाबा इथे सलग तिसरा विजय मिळवून मालिका 3-1 ने जिंकण्याची संधी होती. मात्र पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही. भारताने अशाप्रकारे ही मालिका 2-1 ने खिशात घातली.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियानंतर आता पुढील टी 20i मालिका केव्हा खेळणार? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. या निमित्ताने टीम इंडियाच्या आगामी टी 20i मालिकेबाबत जाणून घेऊयात. टीम इंडिया आगामी टी 20i मालिका मायदेशात खेळणार आहे. या मालिकेत 5 टी 20i सामने होणार आहेत. टीम इंडियासमोर या मालिकेत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि अखेरीस टी 20i सीरिज खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. उभयसंघात 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान एकूण 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.

वनडे सीरिज

टेस्टनंतर 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान एकदिवसीय मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत. चाहत्यांना वनडे सीरिजचे सर्वाधिक वेध लागले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेनिमित्ताने एक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे या मालिकेची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

टी 20i सीरिज

दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याची सांगता टी 20i मालिकेने होणार आहे. उभयसंघात 9 ते 19 डिसेंबर दरम्यान 5 टी 20i सामने होणार आहेत. सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. भारताला टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची अशी आहे.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, मंगळवार, 9 डिसेंबर, कटक

दुसरा सामना, गुरुवार, 11 डिसेंबर, मुल्लानपूर

तिसरा सामना, रविवार, 14 डिसेंबर, धर्मशाला

चौथा सामना, बुधवार, 17 डिसेंबर, लखनौ

पाचवा सामना, शुक्रवार, 19 डिसेंबर, अहमदाबाद

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.