इंडिया ए आणि दक्षिण अफ्रिका ए संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामनाभारताने आपल्या खिशात घातला. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून दक्षिण अफ्रिकेला व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न असेल. तर दक्षिण अफ्रिका ही मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल. दरम्यान, भारताने दुसर्या डावात 89.2 षटकांचा सामना 382 धावांवर 7 गडी गमावले आणि डाव घोषित केला. तसेच दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 417 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेने सावध सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवशी एक गडी न गमावता दक्षिण अफ्रिकेने 25 धावा केल्या आहेत. आता चौथ्या म्हणजेच शेवटच्या दिवशी टीम इंडियाला 10 विकेट काढण्याचं आव्हान असणार आहे. अजूनही दक्षिण अफ्रिकेला 392 धावांची गरज आहे. त्यामुळे टीम इंडियाचे गोलंदाज पहिल्याच सत्रात झटपट विकेट काढण्यासाठी प्रयत्नशील असतील.
दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताने पहिल्या डावात 77.1 षटकांचा सामना केला आणि 255 धावा केल्या. यात ध्रुव जुरेलच्या एकट्याच्या नाबाद 132 धावा होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेने 47.3 षटकात सर्व गडी गमवून 221 धावा केल्या. पहिल्या डावात भारताला 34 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताकडून पुन्हा एकदा ध्रुव जुरेलची शतकी खेळी पाहायला मिळाली. ध्रुव जुरेलने हर्ष दुबेसोबत 184 धावांची भागादारी केली. त्यानंतर रिटायर्ड हर्ट झालेला पंत पुन्हा मैदानात उतरला आणि त्याने ध्रुव सोबत 54 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली. यावेळी पंत 54 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार मारत 65 धावांवर बाद झाला. तर ध्रुव जुरेलने 170 चेंडूत 15 चौकार आणि एक षटकार मारत नाबाद 127 धावा केल्या.
तिसऱ्या दिवसीचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकेने विनाबाद 25 धावा केल्या आहेत. जॉर्डन हरमनने नाबाद 15 आणि लेसेगो सेनोकवानने नाबाद 9 धावा केल्या आहेत. मोहम्मद सिराजने 6 षटकं टाकली असून 10 धावा दिल्या. तर आकाश दीपने 3 षटकात 10 आणि प्रसिद्ध कृष्णाने 2 षटकात 4 धावा दिल्या आहे. कुलदीप यादवने एकही षटक टाकलं नाही. त्यामुळे पहिल्या सत्रात कुलदीप यादवचा जलवा पाहायला मिळू शकतो.