>> प्रसाद ताम्हणकर
हजारो हिंदुस्थानी नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली करोडो रुपयांचा गंडा घालणारे सायबर चोरटे आता देशासोबत विदेशातदेखील हा फसवणुकीचा धंदा करू लागल्याचे समोर आले आहे. हिंदुस्थानातील काही सायबर चोरटय़ांनी कॅनडा आणि अमेरिकेतील काही नागरिकांनादेखील डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लुबाडल्याचे नुकतेच बंगळुरू पोलिसांनी उघडकीला आणले आहे. पोलिसांनी यासंदर्भात नुकताच एका कॉल सेंटरवर छापा टाकून 16 लोकांना अटक केली आहे.
देशाच्या विविध प्रांतांतून आलेले हे लोक सायबिट सोल्युशन्स या कंपनीसाठी काम करत होते. पोलीस स्टेशनपासून अवघ्या 200 मीटरवर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ हे कॉल सेंटर कार्यरत होते. अतिशय उच्चभ्रू अशा वसाहतीत असलेल्या या कॉल सेंटरच्या कामाची पद्धतदेखील निराळी होती. कंपनीने या कर्मचाऱयांचे दोन गट तयार करून त्यांना शहरातील दोन वेगवेगळ्या भागांतील घरांमध्ये ठेवले होते. रात्रीच्या वेळी त्यांना कॉल सेंटरमध्ये आणले जाई आणि तिथेच जेवण दिले जाई. त्यानंतर कर्मचारी कामाला सुरुवात करत. कामाच्या वेळी ऑफिसचे दार बाहेरून बंद करण्यात येत असे. कामाची वेळ संपली की, कर्मचाऱयांना पुन्हा थेट त्यांच्या घरी नेऊन सोडण्यात येई.
कस्टम्स अशा तपास संस्थांची नावे वापरून हिंदुस्थानात फसवणूक करणाऱया सायबर चोरटय़ांनी कॅनडा आणि अमेरिकेत तिथल्या तपास संस्थांची नावे वापरून नागरिकांना लुबाडल्याचे समोर आले आहे. या सायबर चोरटय़ांनी त्यासाठी तिथल्या तपास संस्थांची खोटी कागदपत्रे, खोटी ओळखपत्रे, खोटे न्यायालयाचे आदेश अशी भक्कम तयारी केलेली होती. तुमच्या नावाने पाठवलेले पार्सल पकडण्यात आले असून त्यात ड्रग्ज निघाले आहे किंवा आर्थिक घोटाळ्याच्या संदर्भात तुम्हाला तातडीने हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत असे सांगून त्यातून सुटका करून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत असे. यासाठी नागरिकांना खोटे आदेशदेखील दाखवण्यात येत असत. या कॉल सेंटरच्या मालकाला अजून अटक करण्यात आली नसून फसवणुकीचा आकडादेखील उघड झालेला नाही. मात्र हा आकडा प्रचंड मोठा असून पकडण्यात आलेली टोळी ही एका मोठय़ा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीचा छोटा हिस्सा असावी असा पोलिसांना संशय असून त्यांचा तपास चालू आहे.
या कॉल सेंटरमध्ये किमान सहा देशांमधील वेळा दाखवणारी सहा घडय़ाळेदेखील पोलिसांना आढळून आली आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून परदेशातील अनोळखी लोकांची माहिती काढणे, योग्य सावज शोधून त्याला धमकावणे आणि मग विविध मार्गांनी मिळेल तेवढा पैसा त्याच्याकडून काढून घेणे हे काम या लोकांवर सोपवण्यात आले होते. सावज कसे हेरायचे, त्याला कोणत्या शब्दांत धमकवायचे हे लिहिलेली एक क्रिप्टदेखील प्रत्येकाला पुरवण्यात आलेली होती. त्यामध्ये दिलेल्या शब्दांत हे लोक समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत असत. स्वतला एक तपास अधिकारी असल्याचे भासवून, स्वतचे खोटे नाव व त्या नावाचे खोटे ओळखपत्र दाखवून संवाद साधला जात असे आणि मग हळूहळू धमकीची भाषा सुरू करण्यात येत असे.
या गुन्हेगारांनी तर युनायटेड स्टेट्स मॅजिस्ट्रेटची खोटी कागदपत्रेदेखील तयार केलेली होती. त्यामध्ये गुह्यांची नावे, गुह्याचे वर्णन, तपास अधिकाऱयाचे खोटे नाव आणि बॅज नंबर, गुह्याची तारीख, शहर, राज्य आणि काऊंटीचे नाव असे तपशीलवार नमूद करण्यात येत असे. त्यामुळे लोकांचा चटकन विश्वास बसत होता आणि ते अलगद या सायबर गुन्हेगारांच्या तावडीत सापडत होते. तब्बल 40 संगणकांच्या माध्यमातून ही फसवणूक सुरू असल्याचे आढळून आले आहे. पोलीस सध्या जप्त केलेल्या संगणकांची आणि कागदपत्रांची तपासणी करत आहेत.








