Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच चर्चेत असतात. ते सभांमध्ये, पत्रकार परिषदांत अनेक वादग्रस्त विधानं करतात. त्यांच्या काही धोरणांना अमेरिकेत कडाडून विरोध केला जातो. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान असले तरी ते एक मोठे उद्योजक आहेत. त्यांच्या उद्योगांमध्ये दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल होता. दरम्यान, हेच डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या ब्रँडच्या दारुमुळे चांगलेच वादात सापडले आहेत. त्यांच्यावर आता सडकून टीका केली जात असून त्यांच्या ब्रँडच्या दारूचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रम्प वाईनमुळे सध्या अमेरिकेत मोठा वाद निर्माण झाला आहे. फोर्ब्सच्या एका रिपोर्टमध्ये अमेरिकन सैन्याच्या स्टोअर्समध्ये ट्रम्प ब्रँड असलेली वाईन विकली जात आहे, असा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ट्रम्प लेबल असणारी वाईन सुट्ट्यांचा हंगाम सुरू होण्याआधीच वॉशिंग्टन डी. सी, सेंट्रव्हिल, व्हर्जिनिया येथे सैनिक तसेच लष्करातील कर्मचाऱ्यांसाठी ड्यूटी फ्री स्टोअर्समध्ये विकली जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही याची पुष्टी केली आहे. याच कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प सध्या अडचणीत सापडले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांची पाठराखण का केली जातेय?ट्रम्प ब्रँड असणारी वाईन सैन्य कर्मचाऱ्यांसाठीच्या स्टोअर्समध्ये विकली जात आहे. परंतु यामुळे कायद्याचे उल्लंघन होत नाही, असे शासकीय अधिकाऱ्याने सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनीही याला पाठिंबा देत ट्रम्प यांची पाठराखण केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्योगांचे अनेक ब्रँड आहेत. याच ब्रँडमध्ये वाईनचाही एक ब्रँड आहे. परवान्याच्या सुविधेअंतर्गत ही वाईन विकली जात आहे. यात डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणताही थेट संबंध नाही, असा दावा ट्रम्प समर्थक करत आहेत.
ट्रम्प यांच्यावर होतेय सडकून टीकातर दुसरीकडे सैनिकांसाठी ट्रम्प ब्रँडची वाईन विकली जात असेल तर हे विशेषाधिकाराचा व्यवसायासाठी फायदा घेण्यासारखे आहे, असे म्हणत ट्रम्प यांच्यावर टीका केली जात आहे. वॉशिंग्टन येथील citizens for Responsibility and Ethics in Washington (CREW) या संस्थेचे प्रवकृते जॉर्डन लाइबोविट्झ यांनी हा कादेशीर गुन्हा ठरत नसेलही परंतू हा मुद्दा नैतिकतेचा आहे. सरकार ट्रम्प ब्रँडची वाईन विकत घेत असेल तर हे संविधानाचे उल्लंघन आहे, असा दावा जॉर्डन यांनी केला आहे. दरम्यान, आता ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली जात असल्यामुळे ते यावर नेमकं काय स्पष्टीकरण देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.