IND vs SA : कॅप्टन पंतची घोडचूक, भारताचा 5 विकेट्सने पराभव, दक्षिण आफ्रिकेकडून मालिका बरोबरीत
Tv9 Marathi November 09, 2025 10:45 PM

इंडिया ए टीमने ऋषभ पंत याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या अनऑफीशियल टेस्टमध्ये विजय मिळवला होता. भारताने या विजयासह 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे भारताला दुसऱ्या आणि अंतिम 4 दिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्यासह दक्षिण आफ्रिका ए टीमचा 2-0 ने धुव्वा उडवण्याची संधी होती. मात्र कॅप्टन पंतच्या एका निर्णयामुळे भारताला अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तसेच या पराभवामुळे भारताने मालिका जिंकण्याची संधीही गमावली. भारतीय संघ 400 पेक्षा अधिक धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने यासह ही मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवत पहिल्या पराभवाची परतफेडही केली. भारताच्या या पराभवामुळे ध्रुव जुरेल याने दोन्ही डावात केलेली शतकी खेळी व्यर्थ गेली. तसेच भारतीय गोलंदाजही पाहुण्या संघाला रोखण्यात निष्प्रभ ठरले.

सामन्यात काय झालं?

टीम इंडिया पहिल्याच डावात अडचणीत सापडली होती. मात्र ध्रुव जुरेल याने भारतासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. ध्रुवने शतकी खेळी करत भारताला 250 पार पोहचवलं. ध्रुवने केलेल्या नाबाद 132 धावांच्या जोरावर भारताने 255 रन्स केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल करत दक्षिण आफ्रिकेला 221 रन्सवर गुंडाळलं. टीम इंडियासाठी प्रसिध कृष्णा याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. मोहम्मद सिराज आणि आकाश दीप या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हर्ष दुबे आणि कुलदीप यादव या जोडीने 1-1 विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला आघाडी मोडीत काढण्यापासून रोखलं. भारताला पहिल्या डावात अशाप्रकारे 34 धावांची आघाडी मिळाली.

भारताचा दुसरा डाव

ध्रुव जुरेल याने दुसऱ्या डावातही शतक केलं. जुरेलने नॉट आऊट 127 रन्स केल्या. हर्ष दुबे याने 84 रन्स केल्या. तर कॅप्टन पंतने 65 धावा जोडल्या. भारताने 7 विकेट्स गमावून 382 धावा केल्या. पंतने त्यानंतर डाव घोषित केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 417 धावांचं आव्हान मिळालं. भारताकडे दक्षिण आफ्रिकेला 500 पेक्षा अधिक धावांचं आव्हान देऊन मानसिकरित्या दबाव तयार करण्याची संधी होती. मात्र पंतने डाव घोषित केला. त्यामुळे पंतचा हा निर्णय चुकल्याचं म्हटलं जात आहे.

दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 25 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सामन्याच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी विजयासाठी आणखी 392 धावांची गरज होती. दक्षिण आफ्रिकेने हे या धावा 5 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं.

दक्षिण आफ्रिकेच्या ए टीमला लेसेगो सेनोक्वाने आणि जॉर्डन हरमन या जोडीने चांगली सुरुवात मिळवून दिली. जॉर्डनने 91 तर लेसेगोने 77 धावा केल्या. जुबेर हामजाने 77 धावा केल्या. तर अनुभवी टेम्बा बावुमा याने 59 रन्स केल्या. तर कॉनर एस्टरहुईजन याने 52 धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 417 धावांचा टप्पा सहज पूर्ण केला.

दुसऱ्या डावात प्रसिध कृष्णा याने दुसऱ्या डावात 2 विकेट्स मिळवल्या. मोहम्मद सिराज आणि आकाश दीप या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. कुलदीप यादव याला विकेटही घेता आली नाही. भारताने 5 विकेट्स मिळवल्या. मात्र दुसरा सामना जिंकण्यात इंडिया अपयशी ठरली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.