अनेक गरीब घरातील मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याचे तुम्ही ऐकले असेल. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील प्रिया अग्रवाल ही तरूणीही यातील एक आहे. प्रियाने कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर गगनभरारी घेतली आहे. मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) 2023 च्या परीक्षेत तिने राज्यात सहावा क्रमांक मिळवला आहे. ती आता लवकरच उपजिल्हाधिकारी पद स्वीकारणार आहे. प्रियाच्या या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तिची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊयात.
वडील प्रसादाचे दुकान चालवतातप्रिया ही सतना जिल्ह्यातील बिरसिंहपूर शहरातील रहिवासी आहे. प्रियाचे वडील विजय अग्रवाल प्रसिद्ध गायविनाथ शिव मंदिराजवळ प्रसाद आणि नारळाचे एक छोटेसे दुकान चालवतात. त्यांना मर्यादित पासे मिळतात. या परिस्थितीत प्रियाने कठोर परिश्रम करत आपले अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यामुळे तिच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आहेत. MPPSC मध्ये टॉप 10 मध्ये स्थान मिळवणे हे तिच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. प्रियाने याआधी रीवा जिल्ह्यात जिल्हा कामगार अधिकारी म्हणूनही काम केलेले आहे, आता ती थेट उपजिल्हाधिकारी बनली आहे.
सहाव्या प्रयत्नात मिळाले मोठे यशप्रिया अग्रवालने 2018 मध्ये एमपीपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती. सुरुवातीला तिला अपयश मिळाले, मात्र तिने मेहनत सुरु ठेवली. आता सहाव्या प्रयत्वात ती राज्यातून सहाव्या क्रमांकाने पास झाली आहे. या यशामागे कठोर परिश्रम, कुटुंबाचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे खरे कारण आहे असं तिने सांगितले. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ति जेव्हा घरी परतली तेव्हा संपूर्ण शहरात आनंदोत्सव साजरा केला जात होता, लोकांनी ढोल-ताशांच्या गजरात हार घालून तिचे स्वागत केले.
तरुणांसाठी प्रेरणाप्रिया अग्रवालच्या या यशामुळे राज्यासह देशभरातील लाखो तरूणांना प्रेरणा मिळाली आहे. जे तरूण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांनी खचून न जाता अभ्यास सुरू ठेवावा. कारण कितीही संकटे आली तरी शेवटी मेहनत करणाऱ्याला फळ नक्की मिळते हे प्रियाच्या या प्रेरणादायी प्रवासातून स्पष्ट झाले आहे.