IND vs SA: कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण की…
GH News November 10, 2025 06:11 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या भारतासाठी दक्षिण अफ्रिका कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या मालिकेत दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने मात दिली तर अंतिम फेरीचं समीकरण सोपं होईल. अन्यथा मागच्या वेळेसारखं सर्व काही फिस्कटून जाईल. ही मालिका भारतात होत असल्याने भारतीय संघाला सोपं जाईल, असं म्हंटलं जात आहे. पण ही मालिका जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण वेस्ट इंडिजच्या तुलनेत दक्षिण अफ्रिकेचं मोठं आणि तगडं आव्हान असणार आहे. कारण दक्षिण अफ्रिकन संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यात पाकिस्तानातील कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. आता भारताविरुद्ध 14 नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. पण या मालिकेपूर्वीच दक्षिण अफ्रिकेकडून धोक्याची घंटा मिळाली आहे. कारण दक्षिण अफ्रिकन ए संघाने भारत ए संघाला पराभवाची धूळ चारली आणि क्रीडाप्रेमींना विचार करण्यास भाग पाडलं.

दक्षिण अफ्रिका ए आणि भारत ए संघात अनौपचारिक कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोवर विजयासाठी 417 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 5 गडी गमवून पूर्ण केलं. दक्षिण अफ्रिका ए संघाने भारताच्या मुख्य संघात निवड झालेल्या गोलंदाजासमोर हे आव्हान गाठलं. त्यामुळे भारतीय गोलंदाजांची पकड सैल झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यात दक्षिण अफ्रिका ए संघाच्या विजयात टेम्बा बावुमाने मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात टेम्बा बावुमा दक्षिण अफ्रिका ए संघात खेळला. पहिल्या डावात गोल्डन डकवर गेला. पण दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांना पाणी पाजलं. त्याने 101 चेंडूंचा सामना 59 धावा काढल्या. दुखापतीनंतर पुनरागमन करत टेम्बा बावुमाने ही अर्धशतकी खेळी केली.

टेम्बा बावुमाने मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि कुलदीप यादव यांचा सामना करत धावा काढल्या. हे तिघंही भारतीय संघात आहेत. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टेम्बा बावुमाचा चांगलाच सराव झाला असावा. पण बावुमाचा भारताविरुद्ध काही खास रेकॉर्ड नाही. भारताविरुद्ध फक्त चार कसोटी सामने खेळला आहे. यात एकूण 152 धावा केल्या आहेत. पण एकही अर्धशतक नाही. पण आता बावुमा चांगल्या फॉर्मात आहे. मागच्या दीड वर्षात त्याने चांगल्या धावा काढल्या आहेत. त्याने 7 कसोटी सामन्यांच्या 13 डावात 59 च्या सरासरीने 711 धावा केल्या आहे. त्यामुळे कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण अफ्रिकेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. भारतीय गोलंदाजांना खूपच घाम गाळावा लागणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.