बांगलादेशात पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्या ग्रामीण बँकेच्या मुख्यालयाबाहेर बॉम्बने हल्ला केला. यामुळे मोठा स्फोट झाला आहे. राजधानी ढाक्यात तणाव वाढला आहे, तुरळक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत असताना हा मोठा हल्ला झाला आहे. त्यामुळे आता देशात पुन्हा देशात हिंसक आंदोलने सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुहम्मद युनूस यांच्या एका सल्लागाराच्या दुकानांसमोरही हल्लेखोरांनी बॉम्ब हल्ला केल्याचे समोर आले आहे. तसेच ढाक्यातील 2 बसेसला आग लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मीरपूर पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ग्रामीण बँकेसमोर पहाटे 3:45 वाजता बॉम्बस्फोट झाला. यामागे कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत.
मुहम्मद युनूस यांनी 1983 साली या ग्रामीण बँकेची स्थापना केली होती, गरिबी निर्मूलन आणि महिला सक्षमीकरणात या बँकेने महत्त्वाचे योगदान दिले होते, यासाठी त्यांना 2006 मध्ये युनूस यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला होता. आता याच बँकेला उडवण्याच्या हेतून हल्ला करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 7:10 वाजता मोहम्मदपूर परिसरातील प्रबर्तनसमोर दोन दुचाकीस्वारांनी कच्चे बॉम्ब फेकले आणि त्यांचा मोठा स्फोट झाला. तसेच शहरातील धनमोंडी परिसरातील दोन ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट केले. तसेच इब्न सिना हॉस्पिटलजवळही बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. त्यामुळे आता देशात पुन्हा एकदा अशांतता निर्माण झाली आहे.
ओल्ड ढाका परिसरातील एका रुग्णालयासमोर 50 वर्षीय लिस्टेड गुन्हेगाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हा हल्लेखोर 2023 मध्ये झालेल्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला होता. तत्पूर्वी तो अनेक वर्षे तुरुंगात होता. त्याली जामीनीवर सुटका झाली होती, आता त्याची हत्या करण्यात आली आहे.