खेळाडूंच्या सुरक्षेची कोणतीही हमी नसल्याने आणि ताणलेल्या संबंधांनंतर बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये का पाठवत नाही? हे श्रीलंका क्रिकेट टीमला आता चांगलंच समजलं असेल. श्रीलंका क्रिकेट टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. मात्र श्रीलंका संघातील 8 खेळाडूंनी दौरा अर्धवट सोडल्याचं समोर आलं आहे. इस्लामाबादमध्ये झालेल्या स्फोटानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या अशा घटनेनंतर श्रीलंकेच्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर आता श्रीलंकेच्या 8 खेळाडूंनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यानुसार श्रीलंका टीम गुरुवारी 13 नोव्हेंबरला पाकिस्तान सोडणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दुसरा सामना रद्द!श्रीलंकेच्या खेळाडूंनी घेतलेल्या निर्णयामुळे रावळपिंडीत होणारा दुसरा एकदिवसीय सामना हा रद्द झाल्यात जमा आहे. पाकिस्तानने या 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. पाकिस्तानने श्रीलंकेवर मंगळवारी 11 नोव्हेंबरला 6 धावांनी मात केली होती. मात्र आता श्रीलंकेच्या खेळाडूंनी घेतलेल्या निर्णयामुळे दुसरा सामना रद्द झाल्याची फक्त औपचारिकताच बाकी आहे. दुसरा सामनाही रावळपिंडी इथे होणार आहे. मात्र इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये फार अंतर नाही. त्यामुळे खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
कहर म्हणजे इतकं होऊनही श्रीलंका क्रिकेट बोर्ड मायदेशी परतणाऱ्या खेळाडूंच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये पाठवणार असल्याचं म्हटलं जात आहे. पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्ड मायदेशी परतणाऱ्या 8 खेळाडूंच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना पाकिस्तान दौऱ्यावर पाठवणार आहे. श्रीलंका क्रिकेट टीमची वनडे सीरिजनंतर पाकिस्तान आणि झिंबाब्वे विरुद्ध टी 20I ट्राय सीरिज नियोजित आहे. आता या ट्राय सीरिजबाबत काय निर्णय होणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
श्रीलंकेचे डोळे कधी उघडणार?दरम्यान याआधी 2009 साली पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या तत्कालीन श्रीलंका क्रिकेट टीममधील खेळाडूंची सुरक्षा धोक्यात आली होती. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये कर्णधार महिला जयवर्धने, चामिंडा वास, अजंता मेंडीस आणि इतर खेळाडूंना दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे जवान शहीद झाले होते. त्यानंतर 10 वर्ष कोणत्याच संघाने पाकिस्तान दौरा केला नाही. मात्र 2019 साली पुन्हा श्रीलंकेने पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याचं धाडस दाखवलं होतं. त्यानंतर आता पुन्हा पाकिस्तानामध्ये खेळण्यासाठी गेलेल्या श्रीलंकेवर सुरक्षेमुळे दौरा अर्धवट सोडून परतण्याची नामुष्की ओढावलीय. त्यामुळे 2 अनुभवानंतर तरी श्रीलंका खेळाडूंच्या सुरक्षेसोबतची तडजोड करणं थांबवणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.