वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेला अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताने विजयीसाठी 298 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हे आव्हान गाठताना सर्व गडी गमवले आणि 52 धावा कमी पडल्या. अंतिम फेरीत एकीकडे धडाधड विकेट पडत असताना दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वार्ड झुंज देत होती. मात्र तिची विकेट पडली आणि विजयाच्या आशा मावळल्या. लॉराने अंतिम फेरीतच नाही तर संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या आठ सामन्यात तिने 67.14 च्या सरासरीने 97.91 च्या स्ट्राईक रेटने 470 धावा केल्या. यात उपांत्य आणि अंतिम फेरीत शतक ठोकलं. लॉराच्या या खेळीमुळे क्रीडाप्रेमीही तिचं कौतुक करत आहेत. आता तिच्या कामगिरीची दखल आयसीसीने घेतली असून तिला खास भेट दिली आहे. लॉरा वॉल्वार्डला ऑक्टोबर 2025 स्पर्धेचा वुमन्स प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जाहीर करून गौरव केला आहे.
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाल्यानंतर लॉरा वॉल्वार्डने आनंद व्यक्त केला आहे. लॉराने सांगितलं की, “भारतात झालेल्या वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत संघाच्या कामगिरीनंतर हा पुरस्कार जिंकणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट सामने आणि उत्कृष्ट कामगिरी झाली. स्पर्धा जिंकणे ही मोठी गोष्ट असली तरी, आम्हाला आमच्या विजयाचा आणि आम्ही दाखवलेल्या अढळ भावनेचा अभिमान आहे. आम्हाला विश्वास आहे की आयसीसी वर्ल्डकप विजेतेपद आमच्या आवाक्यात आहे. मी सर्वांच्या पाठिंब्याची प्रशंसा करते आणि मैदानावर तुम्हाला अभिमानित करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन.”
भारत आणि दक्षिण अफ्रिका अंतिम सामनावुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 298 धावा केल्या आणि विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना दक्षिण अफ्रिकेचा संघ 246 धावांवर बाद झाला. या सामन्यात भारताने 52 धावांनी विजय मिळवला. आता पुढच्या वर्षी टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवतं याकडे लक्ष असणार आहे.