शिक्रापूर, ता. १२ ः शिक्रापूर (ता. शिरूर) येथे गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज कधी खंडित होईल आणि ती कधी येईल, याचा नेमच नसल्याची शिक्रापूरची स्थिती आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शिक्रापूर व परिसरात महावितरणचे हजारो ग्राहक असून, कोट्यवधींचा महसूलही खात्याला या भागातून येतो. अशा स्थितीत येथील वीज ग्राहकांच्या तक्रारी आणि चांगल्या सेवेबद्दलच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हणणे येथील व्यापारी आणि काही ग्राहकांचे आहे. गेल्या १५ दिवसांत येथील वीजपुरवठा इतका विस्कळित झालेला आहे की, वीज कधी येईल आणि कधी जाईल याचा नेमच नाही. पर्यायाने रात्री अपरात्री वीज खंडित होण्यामुळे दुचाकी- चारचाकी वाहन चोरीच्या घटनाही वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या तक्रारींबाबत महावितरणकडून एकच उत्तर येतेय ते मागील भागात बिघाड आहे, दुरुस्तीसाठी परमीट घेतलेले आहे, काळजी करू नका. याच उत्तरांनी शिक्रापूरकर प्रचंड हैरान झालेले आहेत.
शिक्रापुरात गेल्या काही दिवसांत अनेक बांधकाम प्रकल्प उभे राहिल्याने सोसायट्यांमधील वीजग्राहकही मोठा आहे. या ग्राहकांची तर अडचण वेगळीच आहे. गेल्या १५ दिवसांतील विस्कळित वीजपुरवठ्यामुळे या सोसायट्यांमधील जनरेटर सतत सुरू ठेवावे लागत असल्याने डिझेल खर्च वाढत असल्याचे सोसायटीतील रहिवाशांचे म्हणणे आहे.
लोणीकंद (ता. हवेली) येथील सबस्टेशनवर काही दुरुस्तीची कामे सुरू असल्याने त्या सबस्टेशनवर अवलंबित ग्राहक आपण काही दिवस रांजणगाव सबस्टेशनला जोडून घेतले होते. त्याचा परिणाम संपूर्ण शिक्रापुरातील ग्राहकांवर होत होता. मात्र, मंगळवारी (ता. ११) लोणीकंदची दुरुस्ती पूर्ण झाल्याने आता पुन्हा पूर्वीप्रमाणे शिक्रापूर येथील निम्मा ग्राहकभार रांजणगावला, तर निम्मा लोणीकंदला जोडला गेला असून, येथील वीजग्राहकांचा त्रास संपला असे म्हणता येईल.
- एस. के. कवितके, शाखा अभियंता, महावितरण, शिक्रापूर