महाळुंगे पडवळ, ता. १२ : चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (ता. ११) रात्री वाघुरात ठेवलेल्या बकऱ्यांवर तीन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात १५ बकरे ठार झाले.
चांडोली बुद्रुक येथील काळेमळा येथे मेंढपाळ भानुदास बाळू ढेकळे यांनी शेतकरी भरत काळे यांच्या शेतात मेंढ्यांचा वाडा मुक्कामी ठेवला होता. त्यात सुमारे २०० मेंढ्या आणि २० बकरे होती. जवळ मका आणि सभोवताली लांब उसाचे शेत होते. मंगळवारी दिवसभर बकरे चारून आल्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भानुदास यांच्या पत्नी लक्ष्मी या बकऱ्यांसाठी वाघुर लावत होत्या. अचानकपणे तीन बिबट्यांनी बकऱ्यांवर हल्ला केला. अशाही परिस्थितीत लक्ष्मीबाई आणि भानुदास यांनी आरडाओरड करून बिबट्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीनही बिबटे गुरगुरत बकऱ्यांवर तुटून पडले. त्यात १४ बकरे जागेवर ठार झाले, तर एक बकरू बिबट्याने नेले. कसेबसे पाच बकऱ्यांना बिबट्याच्या तावडीतून वाचविण्यात त्यांना यश आले.
याबाबतची माहिती वनसेवक जालिंदर काळे यांना देण्यात आली. बुधवारी (ता. १२) सकाळी वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक संपत तांदळे, वनसेवक जालिंदर काळे, वनसेवक किसन पोखरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील मका व अन्य शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. बछड्यासह मादीचा वावर असल्याचे पंचक्रोशीतील नागरिकांचे म्हणणे आहे. कीर्तनावरून जात असताना अनेक नागरिकांना बिबट्याने दर्शनही दिल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण थोरात पाटील यांनी दिली.
‘अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. सांगा ना साहेब, आम्ही जगायचे कसे?’ हे सांगताना मेंढपाळ भानुदास बाळू ढेकळे यांना अश्रू अनावर झाले होते.
पिंजरे लावण्याची मागणी
‘चांडोली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पाचघरवस्ती, न्हायरेमळा, काळेमळा, बेलदत्तवाडी, वेतालबुवा परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. गेल्या चार ते पाच वर्षात येथे शेळ्या, मेंढ्या, कालवड, पाळीव कुत्री, अशा एकूण १८० पशुधनावर बिबट्यांनी हल्ला केला आहे. तर, ५ नागरिकांवर बिबट्याने यापूर्वी हल्ले केले आहेत. चांडोली बुद्रुक, लौकी व कळंब परिसरात जवळपास २० ते २५ बिबटे असावेत. या ठिकाणी वनविभागाने दहा ते बारा ठिकाणी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत,’ अशी मागणी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप थोरात यांनी केली.