पुरुषांना मासिक पाळीच्या वेदना जाणवल्या पाहिजेत..; असं म्हणून रश्मिका अडचणीत, आता दिलं स्पष्टीकरण
Tv9 Marathi November 15, 2025 09:45 AM

मासिक पाळी आणि त्यात स्त्रियांना होणाऱ्या वेदना यावर अनेकदा बोललं जातं. सेलिब्रिटीसुद्धा यावर आपली मोकळी मतं मांडताना दिसतात. परंतु मासिक पाळीच्या वेदना एकदा तरी पुरुषांनी अनुभवल्या पाहिजेत, असं म्हणणाऱ्या अभिनेत्री रश्मिका मंदानावर नेटकरी नाराज झाले आहेत. रश्मिकाने जगपती बाबू यांच्या ‘जयम्मू निश्चयमू रा’ या टॉक शोमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. यामध्ये तिने पुरुषांनीसुद्धा मासिक पाळीचा त्रास अनुभवावा, असं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यावरून अनेक पुरुषांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. समाजात पुरुषांना इतरही अनेक वेदना सहन कराव्या लागतात, असं मत चिडलेल्या नेटकऱ्यांनी मांडलं. यानंतर आता रश्मिकाने स्पष्टीकरण दिलं आहे. अशा ट्रोलिंगमुळेच टॉक शोज आणि मुलाखतींमध्ये जायला भीती वाटते, असं तिने म्हटलंय.

रश्मिकाच्या एका चाहतीने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर तिच्या वक्तव्याची क्लिप शेअर केली आहे. ‘पुरुषांनी मासिक पाळीचा त्रास अनुभवायला हवा, असं रश्मिका म्हणतेय. कधी कधी आम्हाला इतकंच वाटततं की आमच्या वेदना आणि भावना समजून घ्यायला हव्यात. तिचं हे वक्तव्य पुरुषांच्या जबाबदाऱ्यांशी तुलना किंवा त्यांना कमी करण्याबद्दल कधीच नव्हतं. पण नाजूक अहंकारांनी तिच्या वक्तव्याचा वेगळाच अर्थ काढला,’ अशा शब्दांत रश्मिकाची बाजू संबंधित युजरने मांडली. याच क्लिपवर आता रश्मिकाने उत्तर दिलं आहे.

चाहतीच्या पोस्टवर कमेंट करत रश्मिकाने लिहिलं, ‘आणि याबद्दल कधीच कोणी बोलत नाही. शोज किंवा मुलाखतींमध्ये जाण्यामागची ही माझी भीती आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ वेगळा होता आणि लोकांना त्याचा अर्थ वेगळाच काढला.’ रश्मिकाचं हे उत्तर आता सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

रश्मिकाची पोस्ट-

And this no one will talk about.. 😄❤️
The fear of going to shows and interviews is this for me.. I mean something and it’s taken in something else entirely.. 🙁

— Rashmika Mandanna (@iamRashmika)

टॉक शोमध्ये जगपती बाबू यांनी रश्मिकाला विचारलं होतं की, पुरुषांनाही मासिक पाळी आली पाहिजे असं तिचं मत खरं आहे का? त्यावर मान्य करत रश्मिका म्हणाली, “होय, मला वाटतं की त्यांना किमान एकदा तरी मासिक पाळी यावी, जेणेकरून त्यांना वेदना कळतील. हार्मोनल इम्बॅलन्समुळे आम्हाला अशा भावना जाणवतात, ज्या कधीच समजत नाहीत. तुम्ही पुरुषांवर तो ताण दाखवूसुद्धा शकत नाही, कारण तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी त्यांना ती भावना समजत नाही. म्हणून जर पुरुषांना फक्त एकदा तरी मासिक पाळी आली, तर त्यांना ती कशी असते हे तरी समजेल.”

यावेळी रश्मिकाने स्वत:चाही अनुभव सांगितला. “मासिक पाळीदरम्यान मला प्रचंड वेदना जाणवतात. त्या वेदना इतक्या तीव्र होत्या की त्यामुळे मी एकदा बेशुद्धही पडले होते. यासाठी मी बऱ्याच चाचण्या केल्या आणि डॉक्टरांचे सल्ले घेतले. पण ते कशामुळे होतं, हे कोणालाच माहीत नाही. प्रत्येक महिन्याला मी देवाला एकच प्रश्न विचारते की, तुम्ही मला का इतक्या वेदना देत आहात? जेव्हा एखादी व्यक्ती त्या वेदना अनुभवेल, तेव्हाच ती त्याला समजू शकेल. यामुळे पुरुषांनी एकदा तरी मासिक पाळीचा त्रास अनुभवायला हवा, असं मला वाटतं”, असं ती पुढे म्हणाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.