नअस्कार! दिवसातून तीनदा कोपऱ्यावरच्या दुकानात जाऊन फॉल बिडिंगला दिलेली साडी झाली का, असं विचारून येत्येय. अजून मेल्यानं दिली नाही. जीव नुसता वर्खाली होतोय. त्याला शेवटी आत्ता सांगून आल्ये की, ‘रैवारच्या आत तरी दे मेल्या, मला ‘बालगंधर्व’ला नाटकाला जायचंय..’
‘हात्तिच्या, दामल्यांच्या १३३३३ व्या प्रयोगाला चाललाय, असं सांगायचं ना मग! दुपारी घेऊन जावा! मीसुद्धा जाणाराय,’ असं तोच म्हणाला. घ्या!
...आधीच सांगून टाकत्ये, मी प्रशांत दामले यांची खूप मोठी चाहती आहे ही काही बातमी नाही. सगळेच असतात. येत्या रविवारी त्यांचा कारकीर्दीतला १३३३३ वा प्रयोग आहे. नाटक आहे - ‘शिकायला गेलो एक..’ द.मा. मिरासदारांच्या ‘व्यंकूची शिकवणी’ या सदाबहार कथेचा हा आधुनिक नाट्यावतार रसिकांना आवडला आहेच. त्या भन्नाट प्रयोगाला मी जाणार आहे, आणि खास त्यासाठी मी नवीकोरी साडी घेऊन आल्ये आहे. प्रशांत दामले यांचा १३३३३वा प्रयोग म्हणजे दिवाळीनंतरची दिवाळीच.
...तर रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून मी इथं जाहीर करत्ये, की चक्रवर्ती रंगसम्राट नाट्यनृपति विनोदधुरंधर प्रयोगप्रतापी श्रीश्रीश्री प्रशांत दामले यांचा विजय असो! (रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून करून रंगदेवता दमेल; पण प्रशांत दामले थांबणार नाहीत.) त्यांची सिंगल इंजिनची ‘वंदे नाट्यभारत’ धडधडत निघाली आहे.
येत्या रविवारी बालगंधर्व नाट्य मंदिरात त्यांचा तेरा हज्जार तीन्शेतेहेत्तिसावा प्रयोग आहे. हा आकडाच छाती दडपविणारा आहे. जगात तीनच गोष्टी शाश्वत आहेत. आकाशीचा सूर्य, चंद्र आणि जिमिनीवरचे दामलेमामांचे सदाबहार नाट्यप्रयोग.
रोजच्या रोज उगवण्याची ही कला प्रशांत दामले यांनी कशी जमवली, हे कोडं आजवर कोणाला कळलेलं नाही. ही अखंड ऊर्जा कुठून येते?, हा चिरंतन सवाल आहे. दामले यांना रंगमंचावर वावरताना बघायला मराठी रसिकांना भारी आवडतं, किंबहुना प्रशांत दामले ही मराठी रंगभूमीची एक (चांगली) सवय झाली आहे, हे चिरंतन सत्य आहे.
एण्ट्रीला टाळी आणि गॅरंटीड लाफ्टरचं गणित दामलेमामांना जसं जमलं तसं आजवर गेल्या दहा हजार वर्षात कुणाला जमलेलं नाही. त्यांची कुणी नक्कल करू शकत नाही की कॉपी करू शकत नाही. वन अँड ओरिजिनल आहेत प्रशांत दामले.
आमचे दुसरे एक रंगधर्मी मित्र श्रीश्री चंदुमामा कुलकर्णी ऊर्फ चंकु यांच्या पाटलोणीच्या खिश्यात एक बारकी डायरी असते. त्यात ते रोज काही नोंदी करुन ठेवतात. त्या डायरीतल्या नोंदीनुसार प्रशांत दामले यांनी ५ एप्रिल १९८३ ते १६ नोव्हेंबर २०२५ या ४२ वर्षात १३,३३३ प्रयोग केले.
बेचाळीस वर्षाचे १५३३० दिवस होतात, रोज एक प्रयोग असा सरासरी हिशेब धरला तर, त्यातले १३,३३३ दिवस प्रयोग झाले. -म्हणजे १९९७ दिवसांचा हिशेब लागत नाही! या गैरहजर दिवसांत प्रशांत दामले काय करत होते? असाही एक सवाल उपस्थित झाला आहे. कदाचित हा संपूर्ण काळ दौऱ्यांचे प्रवास, नाट्यपरिषदेच्या नस्त्या उठाठेवींमध्ये घालवलेला वेळ यासाठी सत्कारणी लागलेला असू शकतो.
लंडनच्या ‘वेस्ट एण्ड’ थेटरात अगाथा क्रिस्तीच्या ‘माऊसट्रॅप’ नाटकानं ६ ऑक्टोबर १९५२ रोजी सुरवात केली, ते नाटक कोरोनाकाळ वगळता सलग ५२ वर्षं चालू आहे. नुकताच त्याचा ३३ हजारावा प्रयोग झाला म्हणे. प्रशांत दामले हा मराठी रंगभूमीचा ‘हौस ट्रॅप’ आहे!
‘सुख म्हंजे नक्की काय असतं?’ या सुरील्या सवालाचं तितकंच सुरीलं उत्तर मराठी मायबाप रसिकांना १३,३३२ वेळा आजवर मिळालंय. ही जादू अशीच निरंतर चालत राहो, या शुभेच्छांसह.