'शब्दधून' गाणारा कवी
esakal November 16, 2025 09:45 AM

- ऋचा थत्ते, rucha19feb@gmail.com

‘लय एक हुंगिली

खोल खोल श्वासात

ओवीत चाललो

शब्दांच्या धाग्यात

लहडला वेल...

तो पहा निघाला गगनी

देठांना फुटल्या

कविता पानोपानी!’

कविवर्य सुधीर मोघे यांच्या शब्दांनी रंगमंच उजळत चालला होता. कविताही त्यांचीच आणि सादरीकरणही त्यांचेच. एकट्याने रंगमंचावर केलेला वावर विलक्षण ताकदीचा होता. प्रेक्षक भारावून गेले होते. ‘कविता पानोपानी’ हा त्यांचा कार्यक्रम पाहण्याचा दोनदा योग आला. त्या काळात कवितेचं वाचन काहीसं कमी होऊ लागलं होतं. पण अशा कार्यक्रमांमुळे पुन्हा कुतूहल वाढायला नक्कीच मदत व्हायची. शिवाय सादरीकरणामुळे कविता नेमकी पोहोचायची. उत्तम सादरीकरण करून कविता पोहोचवण्यात सुधीरजींचं योगदान नक्कीच भरीव आहे.

हा कार्यक्रम अनुभवल्यावर मग आपोआपच पक्ष्यांचे ठसे, लय असे त्यांचे काव्यसंग्रह वाचनात येत गेले.

काही कविता तर इतक्या आवडल्या, की सहज मुखोद्गतही झाल्या. सादर करताना तर प्रत्येक वेळी आनंद मिळतोच.

दाटून आलेल्या संध्याकाळी

अवचित सोनेरी ऊन पडतं

तसंच काहीसं पाऊल न वाजवता

आपल्या आयुष्यात प्रेम येतं

ही कविता सुरू झाली, की समोरून ‘अहाहा’ अशी दाद येतेच. अर्थात ही सुधीरजींच्या शब्दांची ताकद आहे आणि अशा अनेक कविता.. गदिमा, शांताबाई, पाडगांवकर यांच्याप्रमाणेच सुधीरजींच्या आवडत्या कविता माझ्याही वहीच्या पानोपानी उमटू लागल्या. पण ही तर फक्त सुरुवात होती. ‘शब्दधून’ हा त्यांचा संग्रह हाती आला आणि त्यात हरवूनच गेले. शब्दांविषयी इतकं लिहिता येतं?

शब्दांविषयी लिहिलेल्या चार-चार ओळींना ते ‘कणिका’ म्हणून संबोधतात. मला सर्वात जास्त स्पर्शून गेली ती ही कणिका -

‘शब्दांना नसते दुःख

शब्दांना सुखही नसते

ते वाहतात जे ओझे..

..ते तुमचे माझे असते’

या चार ओळींमुळे आपण शब्दांकडे वरवर न पाहता अंतरंगात डोकावू लागतो. विचार आणि भावना पोहोचवण्याचं शब्द हे माध्यम आहे. शाब्दिक खेळ तत्काळ दाद मिळवून देतातही. पण अंतर्मुख करते ती आशयघनता. ही जाणीव होण्याची सुरुवात अशाच शब्दांमुळे झाली असावी.

एखाद्या कलाकाराचं लेखन, सादरीकरण आवडू लागलं, की रसिक म्हणून आपल्याला नक्कीच कुतूहल वाटू लागतं, की कशी झाली असेल यांची जडणघडण? मग त्यांचं आत्मकथन आपण आवर्जून वाचतो किंवा मनोगतं, मुलाखती ऐकतो. या माध्यमातून खूप शिकायला मिळतं, प्रेरणा मिळते. कलाकार म्हणूनही आणि माणूस म्हणूनही. सुधीर मोघे यांच्या आठवणीही अशाच आपल्याला समृद्ध करतात.

कविता लेखन आणि सादरीकरण या दोन्ही गोष्टींसाठी सुधीर मोघे कीर्तनकलेचं ऋण मानतात. वडील राम गणेश मोघे यांचं कीर्तन ऐकून ऐकून कविता सादरीकरणासहितच त्यांच्यात भिनत गेली. कीर्तन म्हणजे वक्तृत्व, काव्य, संगीत, अभिनय या सगळ्याचा संगम. कै. शं वा. किर्लोस्कर रामबुवांना पत्रात वेळोवेळी सुचवायचे, की ‘तुमच्या धाकट्या मुलानं तुमचा कीर्तनाचा वारसा चालवावा.’

सुधीरजींनी कीर्तन केलं नसेल, पण त्या कलेशी निगडित अशा सगळ्याच गोष्टी काहीशा वेगळ्या रूपात आत्मसात केल्या होत्याच. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू हेच सांगतात. कविता लेखन, सादरीकरण, गीतलेखन, संहितालेखन, त्यासाठीचं संशोधन, निवेदन आणि संगीतकार म्हणून केलेलं काम... हे सगळं पाहताना जाणवतं, की ही कीर्तनाचीच वेगवेगळी अंग आहेत.

गीतकार म्हणून सुधीरजींचं स्मरण करताना गीतांची मालिकाच मनात आकार घेते. सखी मंद झाल्या तारका, एकाच या जन्मी जणू, फिटे अंधाराचे जाळे, दयाघना, सांज ये गोकुळी... अशी अवीट गोडीची किती गाणी सांगावीत! त्या गाण्यांमागच्या आठवणीही तेवढ्याच खास आहेत. ‘झुलतो बाई रासझुला’ हे निळाईत रंगलेलं गाणं.

‘वाऱ्याची वेणु, फांद्यांच्या टिपऱ्या’ ही कल्पना असो किंवा ‘आभाळाच्या भाळावरी चंदेरी टिळा’ हे शब्द असोत.. ‘वाह’ अशी दाद येतेच; पण हे गाणं लिहिणं कसं आव्हानात्मक होतं हे कळल्यावर तर अजूनच आश्चर्य वाटतं. ‘रंगला ग रास सखि रास रंगला’ हे गाणं आधी तयार झालेलं होतं; पण नृत्यदिग्दर्शक नायडू यांच्याकडून रासाची गीतं ‘खेमटा’ तालावर असतात असं समजलं.

मग पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी नवी चाल बांधली आणि सुधीरजींनीही मनाची पाटी कोरी करून नवीन गीत लिहिलं - ‘झुलतो बाई रासझुला’. हे गाणं आधीपेक्षा सकस झाल्याचं समाधान त्यांना लाभलं. पण हे कशामुळे? तर ‘मला पुन्हा लिहावं लागलं’ अशी सक्ती न मानता उलट आव्हानांना सामोरं जाणारा त्यांच्यातील जातिवंत कलाकार जागृत असल्यामुळेच.

असंच ‘माहेरची माणसं’ या चित्रपटातील अजून एक आव्हानात्मक गीत म्हणजे ‘तिथे नांदे शंभू कैलासाचा पती’ बारा ज्योतिर्लिंगांसाठी बारा अंतरे लिहायचे होते. प्रत्येक कडव्याचा राग आणि ताल वेगळा. आणि प्रत्येक कडवं संपताना मुखड्याच्या मूळ ‘शंकरा’ रागात परतायचं होतं. गीतकार आणि संगीतकार दोघांसाठी हे खऱ्या अर्थानं ‘शिवधनुष्य’ होतं. पण बाबूजी आणि सुधीरजी यांनी ते गीत ताकदीने साकारलं.

‘गाणारी वाट’ या पुस्तकात या अशा आणि अन्य गीतांबद्दल वाचताना भारावून जायला होतं. ‘शब्दांना फक्त स्मरावे’ असंच वाटत राहतं.

अर्थात शब्दाबरोबर संगीताची धूनही त्यांनी कायम जपली. भेटशील केव्हा, माझे मन तुझे झाले ही त्यांनी लिहून संगीतबद्ध केलेली गीतं किती भावमधुर आहेत! आणि ‘रंगुनी रंगात साऱ्या’ या सुरेश भटांच्या शब्दांना चढवलेला स्वरसाज तर अजरामर असाच. एखाद्या कलाकाराची कारकीर्द इतक्या बाजूंनी समृद्ध असू शकते याबद्दल नक्कीच आश्चर्य वाटत राहतं.

सुधीरजींच्या वाटचालीकडे पाहताना मिळालेली प्रेरणा त्यांच्याच शब्दात सांगायची तर-

शब्दांच्या आकाशात

शब्दांचे मेघ भरावे

शब्दांचे क्षितिज धराया

शब्दाचे भिंग करावे

(लेखिका निवेदिका-व्याख्यात्या आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.