आयुष्याचं संचित तुम्ही किती संपत्ती जमवली यात नसून, तुम्ही किती माणसं जोडली यात असतं. पैसे अनेक मार्गांनी कमविता आले तरी त्यातून जीवाला जीव लावणारी माणसं मिळतीलच असं नाही. त्यापेक्षा चांगली माणसं आयुष्यात असतील तर पैसा ही बाब गौण ठरते. पेणच्या तांडेल कुटुंबाने आयुष्यात हेच तत्त्व अंगीकारल्याचे दिसते. म्हणूनच शून्यातून सुरुवात करून आज नथुराम तांडेल यांची तिसरी पिढी समाधानी आयुष्य जगत आहे.
पेणचा आता विस्तार झाला असला तरी एकेकाळी या नगरामधील प्रत्येकजण एकमेकांना ओळखत असे. त्यामुळे स्थानिकांसाठी अप्पांची मिसळ घरच्या पदार्थासारखी होती. आताही मूळ पेणवासींपैकी कुणीतरी घरातून किटली घेऊन येतं आणि त्यात उसळ देण्याची मागणी करतं, तेव्हा पदार्थ आणि तिथल्या माणसांवरील विश्वासाची प्रचीती येते.
पेणच्या प्रसिद्ध चावडी नाक्यावरील ‘अप्पा तांडेल स्नॅक्स’ ही केवळ मिसळ-बटाटा वडा मिळण्याची जागा नसून आजघडीला विविध क्षेत्रात नाव कमावलेले मूळ पेण निवासी आणि पेणच्या बाहेरील अनेकांसाठी एक हळवा कोपरा आहे.
गेल्या सात-आठ दशकांच्या वाटचालीत केवळ दोन-तीन पदार्थांवर आपल्या लोकप्रियतेची मदार टिकवून ठेवणे सोपे नाही, परंतु एकेकाळी लोकांना आपले हॉटेल व घरामध्येही अनोळखी लोकांना दाटीवाटीने सामावून घेताना तांडेल कुटुंबाने फक्त प्रेमाने खाऊ घातले नाही, तर त्यांच्या सुख-दु:खातही सहभागी झाले. म्हणूनच इथली मिसळ आणि बटाटा वड्याची चव केवळ जिभेवर रेंगाळत नाही, तर मनात कायमचं घर करून राहते.
सावत्र आईच्या जाचाला कंटाळून जिते गावच्या नथुराम तांडेल यांनी वयाच्या आठव्या वर्षीच घर सोडलं आणि पेणमध्ये दाखल झाले तो काळ ब्रिटिश राजवटीचा. पेण त्याकाळी कुलाब्याचा भाग होतं. पेणमधूनच मुंबई-गोवा हा प्रवास होत असे. याच पेण नगरीतील प्रसिद्ध चावडी नाक्यावर वासुदेव बर्वे यांच्या मालकीच्या कौलारू आणि शेणामातीने सारवलेल्या, लाकडी छत, दरवाजे, खिडक्या असलेल्या वास्तूमध्ये काही दुकानं होती.
त्यातील एक पांडुरंग खरे यांचे सदानंद नावाचे छोटेखानी हॉटेल होते. पांडुरंग यांच्यानंतर ते हॉटेल त्यांचा मुलगा सदानंद यांच्याकडे आले. त्याच हॉटेलात नथुराम कप-बश्या धुण्याचे काम करत असत. अनेक वर्षे काम केल्यानंतर आणि सदानंद यांच्यासोबत सलोखा निर्माण झाल्यानंतर त्यांच्याच मदतीने नथुराम यांनी बाजूच्या गाळ्यात स्वत:चे सोडा-लेमनचे दुकान सुरू केले.
सदानंद धार्मिक प्रवृत्तीचे होते. काही काळ वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टींमधून सन्यास घेतला आणि मोठ्या विश्वासाने आपले हॉटेल नाथुराम यांना चालवायला दिले. अशाप्रकारे खरेंच्या हॉटेलची मालकी तांडेल कुटुंबीयांकडे आली. पुढे त्यांच्या तीन पिढ्यांनी हा विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्रातील पहिल्या पन्नास मिसळींमध्ये आपले स्थान भक्कम केले.
खरेंच्या काळापासून हॉटेलमध्ये लाडू, भजी, शेव, चहा असे पदार्थ मिळायचे. नथुराम यांनी हॉटेलची धुरा सांभाळल्यानंतर उसळ मिळू लागली. उसळ आणि पाव मिळायचा, सोबत ज्यांना हवी असेल त्यांना शेव दिली जायची. काही जण स्वत:चा फरसाण आणून त्या उसळीत टाकून पावासोबत खायचे. पुढे नथुराम यांचा मुलगा यशवंत (अप्पा) हॉटेलमध्ये कामासाठी येऊ लागला.
त्याने हा प्रकार पाहिल्यानंतर या हॉटेलची ओळख पुरती बदलून टाकली. अप्पांनी मिसळच द्यायला सुरू केली. त्यात बटाट्याची भाजी, कांदा यांचा समावेश केला. हिरव्या वाटाण्याची उसळ आणि शेव यात तेव्हापासून आजतागायत बदल झालेला नाही.
चावडी नाक्यावरील सहा टेबलांच्या या छोटेखानी हॉटेलमध्ये पाव, शेव साठवणुकीचे कपाटच गिऱ्हाईक आणि स्वयंपाकघरामधील पार्टिशन होते. लपवा-लपवीची भानगड तेव्हाही नव्हती आणि आता नवीन जागेतही नाही. कुणीही व्यक्ती अगदी सहज किचनमध्ये काय शिजतंय आणि प्लेटमध्ये मिसळ कशी लावली जातेय, हे पाहू शकते. अप्पा स्वत: शेव, उसळ, वडे तयार करायचे.
आता त्यांच्या पश्चात मुलगा योगेश दररोज सकाळी उसळ बनवतो. १९१७ मध्ये उदयास आलेल्या कुलाबा स्टुडंट असोसिएशनचे पुढे कोकण एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले. याच संस्थेने १९८०च्या दशकात पेण येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केल्यानंतर अप्पांची मिसळ खऱ्या अर्थाने पेणच्या बाहेर नावारूपाला आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अप्पा हे आधारवड होते.
चावडी नाक्यावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची त्याकाळी अप्पांच्या वहीत वेगवेगळ्या पानांवर नावे लिहिलेली असायची. विद्यार्थी स्वत:च त्यांनी खाल्लेल्या पदार्थांची नोद त्यात करत आणि महिन्याच्या शेवटी हिशेब होत असे.
या विद्यार्थ्यांची अप्पांसोबत इतकी घनिष्ट होती की, रविवारी सकाळी सर्व विद्यार्थी अप्पांच्या घरी टीव्हीवर ‘महाभारत’ मालिका पाहायला जायची. कित्येक वेळा अप्पा स्वत: दाराच्या बाहेर उभे राहून एका बाजूला कमरेतून वाकून टीव्ही पाहत; पण विद्यार्थ्यांना उठवत नसत.
एकच गोष्ट बनवायची आणि सरधोपटपणे त्याचा वापर करायचा असं इथे चालत नाही. उदा. मिसळ आणि बटाटा वड्यासाठी इथे वेगळी भाजी तयार होते. मिसळीसाठी भाजी बनवताना बटाट्याचे बारीक चौकोनी काप केले जातात, तर वड्यासाठी बटाटा कुस्करून भाजी तयार केली जाते.
कुस्करलेल्या बटाट्याची भाजी मिसळीत वापरली, तर सगळ्या गोष्टींचा रगडा होतो, ज्यामुळे मिसळीतील वेगवेगळ्या गोष्टींच्या चवी मारल्या जातात, असं योगेश सांगतात. इथली मिसळ झणझणीत प्रकारात मोडते; पण खाणाऱ्यांना त्याचा त्रास होत नाही.
कारण उसळ तिखट असली तरी शेव, पापडी, बटाट्याची भाजी, कांदा आणि सोबत पाव असल्याने तिखटाचा समतोल राखला जातो. उसळ बनताना आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचा वापर होतो. मिसळ गोडूस होऊ नये म्हणून खोबरं आणि कांद्याचं वाटण बेतानेच लावलं जातं.
उसळीतील वाटाणे वेगळे शिजवून नंतर गरजेप्रमाणे त्यात टाकले. इथेही वारंवार शिजवून वाटाण्याचा रगडा होऊ नये हा हेतू. पाव पूर्वी पेणमधील सर्वात जुन्या प्रभात बेकरीतून यायचे. आता त्यांनी पावाचे उत्पादन बंद केल्याने दुसऱ्या स्थानिक बेकरीतून येतात.
मिसळीसोबतच इथला बटाटा वडादेखील तितकाच लोकप्रिय आहे. पातळ आवरण असलेला आणि आतून-बाहेरून व्यवस्थित भाजलेला वडा दोन हातांनी मधून फोडल्यानंतर त्यांच्या वाफा धीर धरू देत नाहीत.
सोबतची लसणाची सुकी चटणी आणि आंबट-गोड-तिखट पातळ चटणी वड्याची, वडा-पावची लज्जत आणखी वाढवते. ही ओली चटणी प्रचंड प्रसिद्ध आहे. एक प्लेट वडा सोबत चटणी आणि पाव किती लाद्या खाल्ल्या जातात, अशी पैज विद्यार्थ्यांमध्ये लागे आणि मग अप्पा लहान पातेल भरून चटणी आणून टेबलावर ठेवत असत.
चावडी नाक्यावरील हॉटेलची वास्तू आता अपग्रेड झाली आहे. नवीन वास्तूमध्ये गेल्यानंतर मेन्यूदेखील थोडा वाढलाय. दही मिसळ, उपवासाची खीर, ताक, आइसक्रिम सोडा, जिरा सोडा, सोलकढी हे पदार्थ नव्याने सामील झाले आहेत. त्यातील सोडा प्रकार पूर्वीदेखील मिळायचा, पण गोटी सोडा मिळत असे.
कामगारांची कमतरता आणि सुलभतेअभावी तो प्रकार बंद पडला. जायफळ घातलेल्या चहाने इथे खाण्याचा शेवट होतो. त्यासाठी मोडक यांच्या डेरीतून दररोज दूध येते. त्याचाच वापर दही आणि ताक बनविण्यासाठी केला जातो.
यशवंत तांडेल यांचा मुलगा योगेश आजोबा आणि वडिलांची जागा मोठ्या जबाबदारीने चालवत असला तरी त्याला काका जनार्दन आणि त्यांचा मुलगा नितीन यांची खंबीर साथ आहे. व्यवसाय करणारे, खाणारे जसे पिढ्यानपिढ्या येतात, तसेच काम करणारी मंडळीसुद्धा जुनी आहेत. प्रवीण निकम यांच्यासारख्या जुन्या सहकाऱ्यांना लोकांच्या खायच्या सवयी अचूक ठाऊक आहेत.
अप्पांच्या काळात मिसळ सकाळी दहा वाजताच संपायची, योगेशने त्याची वेळ दुपारपर्यंत वाढवली, आता तर हॉटेल सकाळी साडेसात ते रात्री नऊपर्यंत सुरू असते. आठ-दहा वर्षांपूर्वी नवीन जागेत बस्तान हलविल्यानंतर योगेश यांनी प्रयोग म्हणून संध्याकाळी पावभाजी सुरू केली होती. परंतु ग्राहकांची रात्री नऊ वाजतादेखील मिसळीलाच पसंती असायची. नाइलाजाने त्यांना पावभाजी बंद करावी लागली.
पेणचा आता विस्तार झाला असला तरी एकेकाळी या नगरामधील प्रत्येकजण एकमेकांना ओळखत असे. त्यामुळे स्थानिकांसाठी अप्पांची मिसळ घरच्या पदार्थासारखी होती. आताही मूळ पेणवासींपैकी कुणीतरी घरातून किटली घेऊन येतं आणि त्यात उसळ देण्याची मागणी करतं, तेव्हा पदार्थ आणि तिथल्या माणसांवरील विश्वासाची प्रचीती येते.
योगेश सांगतात, गोवा-अलिबागला जाणारी-येणारी लोकं वाट वाकडी करून अप्पांची मिसळ शोधत पेणमध्ये येतात, तेव्हा खऱ्या अर्थाने इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला गेल्याचं समाधान मिळतं. पदार्थांची चव आणि आपुलकीमुळे ही वाटचाल अशीच सुरू राहील यात शंका नाही.