दहिसर टोलनाक्यावर वनमंत्र्यांचा तोडगा
मुंबई पालिकेची जकात नाक्याची जागा देण्याचे सुतोवाच
भाईंदर, ता.१५(बातमीदार): दहिसर टोलनाका स्थलांतर करण्यासाठी मुंबई पालिकेच्या जकात नाक्याची जागा मिळाली तर ही समस्या सुटेल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. याबाबतची उच्चस्तरीय बैठक घेण्याचे संकेत त्यांना दिले आहेत.
मिरा भाईंदरमध्ये गणेश नाईक यांचा जनता दरबार नुकताच पार पडला. यावेळी दहिसर येथील टोलनाका मिरा भाईंदराच्या हद्दीत स्थलांतर कारायचा झाल्यास तेवढा रुंद रस्ता उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वसईव-िरारच्या हद्दीत टोलनाका स्थलांतर करायचा झाल्यास त्याठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द आहे. त्यामुळे स्थलांतरासाठी दोन्ही जागा योग्य नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आमदार नरेंद्र मेहता यांनी सविस्तर अभ्यास केला असून मुंबई महापालिकेच्या जकात नाक्याची जागा योग्य असल्याचे नाईक म्हणाले. तसेच टोलनाका स्थलांतराचा विषयावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
-------------------------
युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील
कोणाशी स्पर्धा करण्यासाठी जनता दरबार घेत नसल्याने नाईक यांना सांगितले. २००९ पर्यंत या शहराचे नेतृत्व केले आहे. त्यावेळी सातत्याने जनता दरबार घेत असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. तसेच आगामी मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. मात्र स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावनाही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांना सांगितले.
--------------------------------------