वास्तुस्थापत्याचा सुंदर आविष्कार
esakal November 16, 2025 12:45 PM

- ओंकार वर्तले, ovartale@gmail.com

महाराष्ट्राच्या सीमेवर परंतु कर्नाटक राज्यात असलेले बेळगाव आणि मराठी माणसाचे अतूट असे नाते आहे. बेळगाव जिल्ह्यात मराठी टक्का तसा लक्षणीय आहे. त्यामुळे या भागात फिरताना अजिबात परके वाटत नाही. बेळगाव जिल्ह्यात पर्यटनाची अनेक ठिकाणे आहेत. अनेक मंदिरे पाहायला मिळतात. ऐतिहासिक ठिकाणांची रेलचेल आहे. याच पंक्तीत असणारे आणि जिल्ह्यातील कित्तूर गावचे नाव इतिहासकारांना अजिबात नवीन नाही. इतरांना मात्र ते तितकेसे ठाऊक नाही.

बेळगाव जिल्ह्यात पर्यटनाची अनेक ठिकाणे आहेत. अनेक मंदिरे पाहायला मिळतात. ऐतिहासिक ठिकाणांची रेलचेल आहे. याच पंक्तीत असणारे आणि जिल्ह्यातील कित्तूर आणि देगाव. या परिसरात वास्तुस्थापत्याचा सुंदर आविष्कार पाहायला मिळतो.

कित्तूरचे नाव घेताच आठवते ती राणी चेन्नम्मा. महाराष्ट्रात झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे नाव जितक्या आदराने घेतले जाते, तितक्याच आदराने कर्नाटकात राणी चेन्नम्माचे नाव घेतले जाते. इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलत पराक्रम गाजवणारी स्त्री क्रांतिकारक चेन्नम्माविषयी भारतात फारशी माहिती नाही. इ. स. १८२४ मध्ये म्हणजेच इ. स. १८५७ मधील स्वातंत्र्यसंग्रामाच्याही ३३ वर्षे आधी एका स्त्रीने केलेला परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष म्हणजे भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान आहे. यासाठी कित्तूर गाठायलाच पाहिजे.

कित्तूर संस्थानचा राजा मल्लसर्जा याची पत्नी म्हणजे राणी चेन्नम्मा. या चेन्नम्माचा जन्म बेळगावजवळील काकती येथे झाला. या दोघांचा पुत्र अल्पायुषी ठरला. यानंतर लगेचच चेन्नम्मावर पती निधनाचं संकट कोसळलं. वैयक्तिक दुःख बाजूला सारून कित्तूरची गादी चालू राहावी म्हणून चेन्नम्माने एक मुलगा दत्तक घेतला, ताे वयाने लहान असल्यामुळे राणी चेन्नम्मा त्याच्या वतीने राज्यकारभार पाहू लागली.

ब्रिटिशांनी सदर दत्तक कृती ही बेकायदेशीर ठरवली आणि कित्तूर संस्थान खालसा करण्याचा प्रयत्न सुरू केला; पण राणीने मात्र याला विरोध केला. कित्तूर संस्थान छोटेसे आहे. आपण ते सहज जिंकू, असं ब्रिटिशांना वाटलं. म्हणूनच सैन्यासह ब्रिटिश कित्तूरवर चालून आले. त्याचवेळी राणी चेन्नम्मा तिच्या फौजेसह इंग्रजांच्या फौजेवर तुटून पडली. या युद्धात अनेक इंग्रज अधिकारी मारले गेले.

युद्धात ब्रिटिशांचा पराभव झाला. राणी चेन्नम्मा आणि किल्ला अजिंक्य ठरला. ही घटना १८२४ची. एका स्त्रीच्या हातून झालेला हा पराभव इंग्रजांना चांगलाच झोंबला. नंतर दगाबाजीने हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकला आणि राणीला बेलहोंगलच्या किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात आले. नंतर ती कैदेतच मरण पावली. स्त्री ही अबला नाही हे राणी चेन्नम्माने तिच्या कर्तृत्वाने, स्वपराक्रमाने दाखवून दिले. क्रांतीची ज्योत सर्व भारतीयांच्या मनात चेतवण्याची तिने केलेली कामगिरी अतुलनीय आहे.

राणी चेन्नम्माची कर्मभूमी म्हणजे कित्तूरचा भुईकोट किल्ला. या किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला कित्तूर शहर गाठावे लागते. बेळगाव ते कित्तूर हे अंतर ५० कि.मी. असून, बेळगावहून कित्तूरला जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे. किल्ला पाहायला जाताना कित्तूर शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकात घोड्यावर स्वार असलेला राणी चेन्नम्माचा भव्य पुतळा पाहायला मिळतो. या पुतळ्याला वर्णन करूनच पुढे निघायचे.

इतिहास अभ्यासकांच्या मते किल्ला गौडा सरदेसाई यांनी सोळाव्या शतकात बांधला. हा किल्ला भुईकोट प्रकारात मोडतो. सध्या किल्ल्याची तटबंदी आता ढासळलेली पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात विखुरलेल्या या किल्ल्याच्या चारही बाजूस खंदक खोदलेला आहे. गडाच्या आत वस्तुसंग्रहालयसुद्धा उभारले आहे. हे संग्रहालय पाहण्यासारखे आहे.

सध्या किल्ल्यात राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात आणि हेच किल्ल्याचे आकर्षण आहे. हा राजवाडा तीन मजली होता, ज्यामध्ये आत अनेक खोल्या होत्या. राजवाड्यातील खोल्यांमध्ये चर्चा कक्ष, पाहुण्यांसाठी कक्ष, अनेक शौचालये, पूजा कक्ष, भांडार कक्ष, अनेक स्वयंपाकघरे आणि स्नानगृहे आणि इतर विविध खोल्या होत्या. या साऱ्या इमारतींना नावाचे फलकही लावलेले दिसतात.

यातली एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे पोल स्टार व्हिजन. या राजवाड्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की, त्यात एक प्राचीन दुर्बिण होती जी एका खास खोलीत ठेवली जात होती. ही खोली पोल स्टार व्हिजन रूम म्हणून ओळखली जात होती आणि राजवाड्यात राहणाऱ्या व्यक्ती दुर्बिणीच्या मदतीने पोल स्टार पाहण्यासाठी या दुर्बिणीचा वापर करायचे. याशिवाय राजवाड्यात एक भव्य दरबार हॉल किंवा कॉन्फरन्स हॉल होता.

दरबार हॉल, पाहुण्यांच्या खोल्या, जेवणाची खोली, स्टोअर रूम, स्वयंपाकघर इत्यादी खोल्या वास्तुशिल्पातील आविष्कार होते. राजवाड्यात पाणीपुरवठा करण्यासाठी भिंतींमध्ये बांधलेले पितळी पाइप वापरले जात होते. स्वयंपाकघरात चूल, चिमणी आणि वॉशबेसिन होते. राजवाड्यात पाणी साठवण्यासाठी विविध दगडी भांडे आणि टाक्या बांधण्यात आल्या होत्या. राजवाड्यात एक स्विमिंग पूलदेखील होता.

राजवाड्यासमोर एक सुंदर द्वार मंडप बांधण्यात आला होता. या मंडपाला उंच आणि सजवलेले खांब होते. राजवाड्याजवळ आणि किल्ल्याच्या आवारात एक वॉच टॉवर होता. सध्या या टॉवरवर जाता येत नाही.

कित्तूर किल्ला हा आता अवशेषांमधून पाहावा लागतो. राणी चेन्नम्मा हिची शौर्यभूमी असलेल्या या कित्तूरचे वेगळे स्थान भारतीय इतिहासात आहे. एका स्त्रीने इंग्रजांविरुद्ध दिलेला लढा हा भारतीय इतिहासात एक सोनेरी पान म्हणून लिहिला गेलाय. भटकंती करताना अशी ठिकाणे आवर्जून पाहिली पाहिजेत. बेळगावला अनेक पर्यटक येतच असतात; पण इथून अगदी जवळ असलेल्या कित्तूरकडे मात्र वळत नाहीत.

या कित्तूरजवळ आणखी एक भटकंतीचा बोनस दडला आहे. वास्तु-स्थापत्याचा सुंदर आविष्कार असलेले एक पाषाणातले मंदिर आपल्याला देगावजवळ पाहायला मिळते. कित्तूरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाला भेट द्यायला मात्र विसरू नका.

कित्तूरजवळ अनेक पर्यटक येत असतात; पण देगाव या छोट्याशा गावात असणारे कमल नारायण स्वामी मंदिर मात्र बऱ्यापैकी दुर्लक्षित राहिले आहे. गोव्याच्या कदंब राजवटीत बांधले गेलेले हे मंदिर पाहताक्षणीच भुरळ पडणारे आहे. यासाठीच हजारो वर्षांपूर्वीची निर्मिती असलेली ही कलाकृती मात्र आपल्याला डोळ्याखालून घालावी लागतेच.

देगाव हे अतिशय छोटे गाव; पण मंदिराच्या कलाकृतीने श्रीमंत झालेले. ऐन मध्यवस्तीत असलेले मंदिर सध्या पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहे. पूर्वाभिमुख असणाऱ्या या मदिराची रचना सभामंडप, गाभारा अशी असून, हे मंदिर दोन गर्भगृहांचे आहे. म्हणजेच द्विकुटाचल प्रकारचे आहे. फार कमी मंदिरात अशी रचना पाहायला मिळते.

ही दोन्ही गर्भगृह एका शेजारी एक सरळ रेषेत असून, दोन्हीस अर्ध मंडप आहेत. गर्भगृहाच्या चौकटीवर अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे कलाकुसर काम केलेलं आहे. मुख्य मंडपाला नारंग मंडप म्हटले जाते. हा मंडप अतिशय भव्य असून, दोन्ही गर्भगृहासमोर एकसलग आहे. मंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मंडप तोलून धरलाय चाळीस अशा खांबांनी.

हे खांब म्हणजे कलाकुसरीत अतिशय चिंब असे भिजलेले पाहायला मिळतात. या दगडी खांबांच्या चार रांगांची रचनाही आपले डोळ्यांचे पारणे फेडते. यातल्या बाहेरील म्हणजे पूर्व दिशेला असणाऱ्या खांबांवर उतरत्या दगडी छ्परांचा आधार दिलेला आहे. ही रचनाही लांबून पाहण्यासारखी; पण यामुळे हे मंदिर काहीसे बसके वाटते.

याच मंडपात, दोन्ही गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी दोन स्वतंत्र पूर्वाभिमुख मुख मंडप असून, त्याच्या मुखाशी दोन आडवे दगडी खांब आहेत. या प्रवेशद्वारास चौकटी दिसून येत नाहीत. दोन्ही गर्भगृहाच्या मधल्या भागात एक छोटेसे उप गर्भगृह असून, त्यात लक्ष्मी नारायणाची अतिशय देखणी मूर्ती आहे. एकंदरीतच तीन सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. या मूर्ती शिव-पिंडीवर विराजमान आहेत.

या नवरंग मंडपाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तीन शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. या शिलालेखांचे संवर्धन काचेची तावदाने झाकून केलेले आहे. त्यामुळे याची पुढची झीज थांबली आहे. नवरंग मंडपातील कलाकुसर पाहताना आपले भान हरवून न गेले तरच नवल म्हणावे. जेवढे मंदिराचे अंतरंग सुंदर तेवढेच बाह्यरंगही देखणे आहे. दर्शनी भागावर अतिशय सुंदर शिल्प आहेत. कित्तूर आणि देगाव हा सारा परिसर अवघ्या एका दिवसात आरामात पाहून होतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.