शैलेश नागवेकर shailesh.nagvekar@esakal.com
स्ट्राईकर
भूतलावरचा सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल. परदेशातील फुटबॉलचे कोट्यवधी चाहते भारतात सापडतील; पण याच खेळात भारताची सध्या होत असलेली पिछेहाट एकूणच भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी नामुष्की असणारी आहे. जिथून सुरुवात झाली तेथेच पुन्हा जाण्याची स्थिती ओढवलीय. सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी आयएसएल बंदच झालीय. विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता मिळवणे हे आता स्वप्नाच्याही पलीकडचे आहे. २०२७मध्ये होणाऱ्या एएफसी आशिया अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रताही मिळवता आली नाही. आता पुढील काही वर्षांत डोळ्यासमोर ठेवावे असे उद्दिष्टच राहिलेले दिसत नाही.
प्रत्येक संघ एखाद्या मोठ्या स्पर्धेसाठी तयारी करीत असतो; पण कधीकाळी मोठा आशावाद निर्माण करणाऱ्या भारतीय फुटबॉलमधील हवाच आता कमी झालीय. याची एक नाही अनेक कारणे आहेत. प्रशासनातील ढिसाळपणा आणि उदासीनता, आयएसएल, आयलीगसारख्या स्पर्धांमध्ये घातलेला घोळ, खेळाडूंची क्षमता, नवोदितांवर नसलेला विश्वास किंवा त्यांना थेट सीनियर संघात निवडण्याचे नसलेले धाडस, प्रशिक्षक निवडीचा ‘फुटबॉल’ अशी किती कारणे सांगावी तेवढी कमीच आहेत. २०२७मधील एएफसी आशिया अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद मिळवण्याची आलेली संधी गमावली आणि सौदी अरेबियाला ती दिली. या स्पर्धेचे यजमानपद मिळाले असते तर यजमान म्हणून या स्पर्धेत खेळायची संधी मिळाली असती; पण पात्रता मिळवण्याची क्षमता नसताना केवळ मेहरबानी म्हणून खेळण्यात काहीच अर्थ नव्हता.
पण यजमानपद न मिळवता येणे यातून प्रशासनाचा ढिसाळपणा स्पष्ट होतो. थोडक्यात काय तर पायाच मजबूत नसेल तर इमारत कशी उभी राहणार आणि राहिली तरी ती किती काळ तग धरणार? फुटबॉल सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो भारतात आला नाही, पण त्याचा अल नासर हा व्यावसायिक फुटबॉल क्लब गोव्यात येऊन खेळला. काही दिवसांत आणखी एक सुपरस्टार लिओनेल मेस्सी मुंबई, दिल्ली, केरळसह काही शहरांत येणार आहे. तो फुटबॉलचे सामने खेळणार नसला तरी फुटबॉल चाहत्यांसाठी देवच जणू अवरतणार आहे. भारतात येताना मेस्सीने भारतीय फुटबॉलच्या स्थितीता आढावा घेतला, तर त्याच्यासमोर कोणते चित्र उभे राहील? वर्षभरापूर्वी फिफाने देशाकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत मेस्सी, रोनाल्डो यांच्यासह सुनील छेत्रीचे छायाचित्र पोस्ट केले होते. म्हणजे मेस्सीसाठी छेत्री अनोळखी निश्चितच नाही; पण फुटबॉलच्या नकाशावर भारतीय फुटबॉल त्याला सापडणार नाही.
Premium| Women cricket World Cup 2025: भारतीय संघाने रचला इतिहास, पन्नास वर्षांनंतर अनुभवला सुवर्णक्षणएखाद्या खेळात प्रगती व्हायची असेल तर त्या खेळाची संस्कृती असणे किंवा तयार होणे महत्त्वाचे असते. भारतात फुटबॉलची संस्कृती नाही, असे म्हणता येणार नाही. गोवा, केरळ, कोलकाता आणि पूर्वेकडील राज्यांत तर फुटबॉलएवढा लोकप्रिय दुसरा खेळ सापडणार नाही. आपल्या कोल्हापूरमध्ये स्थानिक सामन्यांसाठी लाखो प्रेक्षक येतात. त्यानंतर टीव्ही आणि सोशल मीडियावरून जगभरातील व्यावसायिक लीग आणि स्पर्धा पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. विविध देशांतील आणि विविध लीगमधील खेळाडूंची नावे तोंडपाठ असतात. बार्सिलोना-रेयाल माद्रिद यांचे सामने कधी आहेत याची नोंद करून ठेवलेली असते. इतका मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग असेल तर भारतीय फुटबॉलच्या उत्कर्षाचे घोडे नेमके कुठे अडतेय?
केवळ पाच लाख लोकसंख्या असलेला केपवेर्दे हा देश पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरला आणि आपल्या देशाची लोकसंख्या १४० कोटींची आहे. लोकसंख्या सर्वाधिक म्हणजे एखाद्या खेळात प्रगती अशी तुलना होऊ शकत नाही, पण जागतिक फुटबॉलच्या नकाशावर भारत का दिसत नाही, ही वेदना टोचणारी आहेच. कोणी किती आणि कोणती विजेतेपद मिळवली, यावरून त्या देशांचा दरारा समजून येतो; पण खरी ओळख असते ती जागतिक क्रमवारीतील स्थितीची. शेवटी प्रगतिपुस्तकात किती टक्के मिळाले, यापेक्षा क्रमांक कितवा मिळाला याचीही विचारणा अधिक होत असते. भारतीय फुटबॉलच्या अधोगतीचे विश्लेषण एका बाजूला आपण केवळ क्रमवारीच्या आलेखाचा विचार केला तरी भारतीय फुटबॉलवर कधी आणि कसे स्वयंगोल झाले हे स्पष्ट होईल. किंबहुना क्रमवारी ही प्रत्येकाची स्थिती दर्शवणारा सूचक घटक प्रगतीचा मापदंड समजला जातो.
दरम्यानच्या काळात १९९६मध्ये हेच रँकिंग ९४ पर्यंत पोहोचले होते. एकेक पाऊल पुढे टाकत शिखरापर्यंत जाण्याच्या क्रियेला प्रगती म्हणतात; पण हेच उलट होते त्याला अधोगती असे संबोधले जाते. भारतीय संघाच्या रँकिंगच्या चढ-उताराचा आलेख पाहू या. यावरून चित्र स्पट होईल. फिफाच्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाची १९९२ पासून वाटचाल सुरू झाली. त्या वेळी भारतीय संघ १४२व्या स्थानावर होता. आता २०२५मध्ये आपला संघ १३६व्या स्थानावर घसरला आहे. अशीच घसरण सुरू राहिली तर लवकरच १४२वा क्रमांक पुन्हा येऊन एक वर्तुळ पूर्ण होईल. फिफाच्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाची १९९२ पासून वाटचाल सुरू झाली. त्या वेळी भारतीय संघ १४२व्या स्थानावर होता. आता २०२५मध्ये आपला संघ १३६व्या स्थानावर घसरला आहे. अशीच घसरण सुरू राहिली तर लवकरच १४२वा क्रमांक पुन्हा येऊन एक वर्तुळ पूर्ण होईल.
World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण१९९२-१९९५ : झेप आणि घसरण
डिसेंबर १९९२मध्ये फिफाची क्रमवारीची पहिली अधिकृत यादी जाहीर झाली तेव्हा भारत १४३व्या स्थानावर होता; तरीही आशावाद कायम होता. कारण त्या काळात आय. एम. विजयन चांगल्या फॉर्ममध्ये होता, तर जो पॉल अँचेरी आणि ब्रुनो कुटिन्होसारखे तरुण आक्रमक खेळाडू उदयास येत होते. अनुभवी व्ही. पी. सत्यन तरुण खेळाडूंसाठी मार्गदर्शकही ठरत होता.१९९३ हे वर्ष भारतासाठी उल्लेखनीय होते. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकून वेगाने भरारी घेत वर्षाअखेर अव्वल १००मध्ये प्रवेश केला. मात्र पुढील दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय सामने कमी खेळल्याने (१९९३ मध्ये १८ तर १९४-९५ मध्ये फक्त १२) भारताची क्रमवारी घसरली आणि १९९५ अखेरीस १२१ अशी झाली होती.
१९९६-१९९९ : सातत्यपूर्ण प्रगती
१९९५ नंतर भारताने पुन्हा अधिक सामने खेळायला सुरुवात केली आणि क्रमवारीत सातत्याने सुधारणा झाली. या काळात स्टार खेळाडू भाईचुंग भुटियाचा उदय झाला. विजयन आणि त्याच्या जोडीने कमाल केली. फेब्रुवारी १९९६मध्ये भारत ९४व्या क्रमांकावर पोहोचला. हे आजवरचे सर्वोत्तम रँकिंग आहे. या काळात भारताने सलग दोन सॅफ विजेतेपदे (१९९७ आणि १९९०) मिळवली.
२०००-२०१४ :घसरण आणि अस्थिरता
१९९९ नंतर फिफाने क्रमवारीचे नवे सूत्र लागू केले त्यात प्रतिस्पर्ध्यांच्या ताकदीचा आणि निकालाच्या फरकाचा विचार केला गेला. त्यामुळे भारताने मिळवलेले रँकिंग घसरले. सातत्याचा अभावही त्यास कारणीभूत ठरला. विजयन आणि अँचेरी यांच्या २००३ मधील निवृत्तीनंतर भाईचुंग भुटिया आणि नंतर सुनील छेत्री यांनी संघाचा भार उचलला. तरीही २०१४ अखेरीस भारत १७१व्या रँकिंगपर्यंत घसरला होता.
२०१५-२०१९ : पुन्हा प्रगतीच्या दिशेने
एप्रिल २०१५मध्ये भारत १७३व्या स्थानापर्यंत त्याच्या नीचांकी स्तरावर पोहोचला होता. त्या वेळी स्टीफन कॉन्स्टँटाइन यांची प्रशिक्षक म्हणून पुनर्नियुक्ती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ अधिक संघटित खेळू लागला. २०१४मध्ये सुरू झालेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल)ने भारतीय फुटबॉलमध्ये क्रांती केली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसह भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. भारताने २०१५ सॅफ चॅम्पियनशिप जिंकली, २०१८ मध्ये विश्वचषक पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत पोहोचला आणि क्रमवारीत १३५व्या स्थानापर्यंत प्रगती झाली.
२०१७ : सुवर्णकाळ
भारताने संपूर्ण २०१७मध्ये एकही सामना गमावला नाही (नऊपैकी सात विजय, दोन बरोबरी). याच वर्षी भारताने २१ वर्षांनंतर पुन्हा अव्वल १०० मध्ये प्रवेश केला (जुलै २०१७मध्ये ९६वे स्थान). या यशानंतर एएफसी आशियाई कप २०१९साठी पात्रता मिळाली.
२०१९-२०२४ : आशियाई कप आणि इगोर स्टिमॅक युग
२०१९मध्ये भारताने थायलंडवर ४-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला. १९६४ नंतर आशियाई कपमधील हा पहिला विजय ठरला. मात्र पुढील सामन्यांत पराभव झाल्याने भारत गटातून बाहेर पडला आणि कॉन्स्टँटाइन यांनी पदत्याग केला. नवीन प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्या नेतृत्वाखाली भारताने आशियाई विजेते कतार विरुद्ध ०-० अशी उल्लेखनीय बरोबरी साधली. २०१९ अखेरीस भारत १०८व्या क्रमांकावर होता. मात्र २०२४ मधील आशियाई कप आणि विश्वचषक पात्रता फेरीतील अपयशामुळे संघ १२६व्या स्थानावर गेला. त्यानंतर आता १३६ हा क्रमांक मिळाला आहे.