पिंपरी, ता. १५ ः श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा व ज्युनिअर कॉलेज मधील १७ वर्षाखालील मुलींचा राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत पुणे विभागाने तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक सचिव अनिलकुमार कांकरिया, कोषाध्यक्ष प्रकाशचंद चोपडा, प्राचार्य विक्रम काळे यांनी सर्व यशस्वी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले. या स्पर्धा अहिल्यानगर येथे पार पडल्या. स्पर्धेत कोल्हापूर, नाशिक, लातूर, जालना, अमरावती, मुंबई, पुणे व छत्रपती संभाजीनगर या विभागांचा सहभाग होता.
गेंदीबाई चोपडा हायस्कूलने पुणे विभागाचे नेतृत्व केले. तसेच सेमी फायनल मध्ये नाशिकच्या संघाला पराभूत करून तृतीय क्रमांक मिळविला. विद्यालयातील सिद्धी पांगरे व प्रतीक्षा कचरे या दोन खेळाडूंची अयोध्या, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेत कोल्हापूर विभागाने प्रथम क्रमांक तर मुंबई विभागाने द्वितीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेदरम्यान अरुण कडुस, दीपक कन्हेरे, अंकुश सपकाळ, कुमार कटके, रणजित सातपुते, आकाश खाडे, क्रीडा शिक्षक संदीप माशेरे व रवींद्र गारगोटे यांनी मार्गर्शन केले. खो खो विश्वचषक विजेती प्रियांका इंगळे हिने खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.