समाधीपाशीच्या कंदिलाची संख्या
esakal November 16, 2025 12:45 PM

गावच्या मालका .........लोगो
(२ नोव्हेंबर पान ६)

कोकणात कथित भुताटकी नवीन नाही. त्यात ‘एक हात लाकूड अन् सोळा हात भितळा’ यासारखी अवस्था म्हणजे सावलीलाही भूत समजणे ही आमची मानसिकता. जेवणात नारळ अन् कवठांनी कोंबडी वापरत नाही त्यापेक्षा जास्त वापर भगतगिरीला वापरतो आम्ही. बरं, भूतं पण अठराजातीत विभागलेली हो, कोण ब्रह्मसमंध तर कुठे मुंजा. गीरा, लावसट, शेंद्रीजखीण, लावसट, डाव, खवीस, बायंगं, बाया, आसरा, चेडा असा या भुतांचा गोतावळा मानला जातो.

-rat१५p१३.jpg-
P25O04521
--अप्पा पाध्ये-गोळवलकर , गोळवली
---
समाधीपाशीच्या कंदिलाची
संख्या झाली पंचवीस

माझ्या आयुष्यात घडलेली घटना आजही आठवते अन् श्रद्धा-अंधश्रद्दा; विज्ञानाच्या कसोट्यावर घासूनही त्याचे उत्तर नाही मिळत. झालं असं, आम्ही भावंडं आमच्या आजोळी कडवई या गावात मे महिन्याच्या सुटीत गेलो होतो. मामांच्या घरी पन्नासपेक्षा जास्त पाहुणे असायचे आमच्यासारखे. खूप मज्जा असायची. रायवळ आंबे, फणस, अळू, जांभळं, करवंद असा कोकणीमेवा भरपूर हादडायचा दिवसभर मग तिन्हीसांजा परवचा. रात्री सर्वांची जेवणे झाली की, अंगणात सारीपाटाचा डाव रंगात यायचा. या फाशांच्या खेळात कितीही खेळाडू सहभागी होऊ शकत. लाल रंगाचा अधिक चिन्हासारखा पट, काळ्या पिवळ्याविरूद्ध लाल-हिरव्या लाकडी सोंगट्या अन् हस्तीदंती फासे. हा खेळ कधी कधी पहाटेपावेतो चालायचा.
त्या दिशी अमावास्या की, पूर्णिमा होती. खेळ रंगात आलेला एव्हढ्यात माझ्या मोठ्या बहिणीला शेजारच्या बंद घरातून एक कंदील बाहेर पडताना दिसला. तसे तिने एका मामाला विचारले की, अरे खालच्या आजोबांच्या घरातून कोणीतरी खेळायला येतेय. तर मामा म्हणाला, अगं ते घर बंद आहे. तरीही तो खात्री करण्यासाठी अंगणाच्या कोपऱ्यावर गेला तर खरोखरच एक कंदील येत होता. लगेचच एका पडीक घरातून दुसरा कंदील येऊन पहिल्या कंदिलाला मिळाला अन् दोन्ही कंदीलं मामाच्या घराच्या खाली उतारात असणाऱ्या देवळाच्या आवारात असणाऱ्या समाध्यांपाशी येऊन थांबले. काही वेळातच त्या कंदिलांची संख्या वीस-पंचवीस झाली. तोपर्यंत मामाच्या घरातील तसेच शेजारच्या मामाकडील सर्व मंडळी अंगणात जमून हे बघत होती. नंतर ते कंदील देवळाभोवती प्रदक्षिणा घालू लागले अन् आता कंदील गॅस बत्तीपेक्षा प्रकाशमान झाले होते अन् घुं घुं घुं असे गुंजन ऐकू येऊ लागले होते. माझा एक मामा बोटीवर नोकरीला होता. त्याच्याशी इम्पोर्टेड बॅटरी होती. तो जरा डेअरिंगबाज असल्याने त्याने त्या अदृश्य तरी प्रकाशमान समुहावर बॅटरीचा फोकस मारला; मात्र लगेचच प्रकाशाचा एक तीव्र झोत आमच्यावर आला अन् गुरगुरणेही जोरात सुरू झाले. मग मात्र आम्ही जिला पाय लावून मागे अंगणात पळालो. पुढचा एक तास ते सारे खोरे प्रकाशमान झाले होते अन् मग तो सारा छबिना जिथे होळी लागते त्या दिशेने हळूहळू गेला अन् तो प्रकाशही क्षीण होत गेला.
आयुष्यातील पहिली भुताटकीची झलक मिळाली, अशी चेष्टा अनेकजण नंतर करत होते. नंतर दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणीला सडकून ताप भरला; पण आजीने त्या देवळात एक नारळ दिल्यावर चुटकीसारखा ताप उतरला. आजही त्या देवळात अवसेपूर्णिमेला घंटा वाजते; मात्र त्या वेळी मी पांघरूण डोक्यावर घेऊन रामनाम जपायला सुरू करतो.

(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.