IND vs SA Test: भारताच्या पराभवाची पाच कारणं, असं झालं म्हणून हरलो
GH News November 16, 2025 07:11 PM
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. खरं तर पहिल्या दोन दिवसात टीम इंडियाची बाजू भक्कम होती. मात्र तिसऱ्या दिवशी सर्वच चित्र पालटलं आणि भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात 159 धावा केल्या होत्या. त्या धावांचा पाठलाग करताना भारताने 189 धावा केल्या. म्हणजेच पहिल्या डावात भारताकडे 30 धावांची आघाडी होती. या धावांच्या पुढे खेळतातना दक्षिण अफ्रिकेने 153 धावा केल्या आणि 30 धावा वजा करता 123 धावांचं आव्हान दिलं. पण भारताला या धावा काही करता आल्या नाहीत. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 93 धावांवर तंबूत परतला. भारताला दुसऱ्या डावात 30 धावा तोकड्या पडल्या आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या पराभवाची पाच कारणं समजून घेऊयात..
पराभवाची पाच कारणं
- भारतीय फलंदाज स्पोर्टिंग विकेटवर चांगली कामगिरी करतात, त्यामुळे टर्निंग पिचची गरज नाही? असा एक रणनितीचा भाग आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली अशा रणनीती वापरून भारताला पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला क्लीन स्वीप मिळाला होता. आताही तशीच भीती आहे.
- कसोटी सामन्यासाठी अष्टपैलू खेळाडूंवर जास्त विश्वास टाकला जात आहे. त्यामुळेही टीम इंडियाला फटका बसला असं म्हणावं लागेल. कोलकाता कसोटीत साई सुदर्शनला वगळून वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली गेली. तसेच सहा गोलंदांजांसह कसोटी खेळणं जास्त आश्चर्यकारक होतं.
- कर्णधार शुबमन गिलला झालेल्या दुखापतीमुळे भारताला फटका बसला. कारण दोन्ही डावात एक फलंदाज कमी होतो. कदाचित त्याने फलंदाजी केली असती तर चित्र वेगळं असू शकलं असतं.
- दक्षिण अफ्रिकेकडून कर्णधार टेम्बा बावुमाने चिवट खेळी केली. त्याने अर्धशतक झळकावून टीम इंडियाला अडचणीत आणलं. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेने एकही कसोटी सामना गमावलेला नाही हे विशेष..
- दक्षिण अफ्रिकेने 91 धावात 7 विकेट गमावल्या होत्या. पण पुढच्या तीन विकेटने भारतीय गोलंदाजांना खूपच त्रास दिला. या तीन विकेटने 62 धावा केल्या. त्याच धावा भारताला महागात पडल्या. इतकंच काय तर भारताच्या शेवटच्या तीन विकेट फक्त 16 धावात पडल्या.