राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. काही नेते महायुतीतून महाविकास आघाडीमध्ये जाताना दिसत आहेत, तर काही नेते हे महाविकास आघाडीकडून महायुतीत प्रवेश करताना दिसत आहे. तसेच काही ठिकाणी महायुतीतील अंतर्गत पक्ष एकमेकांचे उमेदवार फोडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अजित पवारांना मोठा दणका दिल्याचे समोर आले आहे.
रायगड जिल्ह्यातील रोह्यात राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या शिल्पा अशोक धोत्रे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. रोह्याच्या माजी नगराध्यक्ष , माजी सभापती शिल्पा धोत्रे यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या घड्याळाची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतला. मंत्री भरत गोगावले व आमदार महेंद्र दळवी यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिल्पा धोत्रे यांच्या प्रवेश कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांनी शिल्पा अशोक धोत्रे यांना रोहा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. शिल्पा धोत्रे या मागील पंधरा वर्षे बिनविरोध निवडून येत आहे. उपनगराध्यक्ष , सभापती ही पदे त्यांनी भूषवली आहेत. शिल्पा धोत्रे यांच्या यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली आहे, तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
या आधी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत अंबरनाथ नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका रोहिणी भोईर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला होता. यावेळी शिंदे साहेबांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष अधिक भक्कम करून जोमाने काम करावे, अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली होती. या कार्यक्रमाला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.