शेटफळगढे, ता. १६ : म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत व आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र, निरगुडे यांच्या संयुक्त विद्यमाने ॲनिमियामुक्त गाव अभियान आणि सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन सोमवारी (ता. १७) करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच राजेंद्र राऊत व ग्रामपंचायत अधिकारी सोनाली गवळी यांनी दिली. पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत हे शिबिर होणार आहे. म्हसोबाचीवाडी येथील कवडे (पवार) महादेव मंदिर येथे सकाळी १० वाजता शिबिराची सुरुवात होईल. यावेळी गरोदर माता तपासणी, पोषक आहाराचे वाटप यांसह उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर व रक्तामधील विविध चाचण्या करण्यात येणार आहेत. तसेच, डोळ्यांची मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.