सोलापूर : सोलापूर शहरातील एका तरुण वकिलाने बुधवारी (ता. १२) रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ॲड. सागर मंद्रुपकर असे त्या वकिलाचे नाव आहे. त्यावेळी त्याने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. वकिलाचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. वकिलाने आत्महत्येपूर्वी ती सुसाईड नोट त्याच्या मैत्रिणीला व्हॉट्सॲपवर पाठविली होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
कौटुंबीक वादामुळे ॲड. सागर हा काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता. बुधवारी म्हणजे आत्महत्येच्या दिवशी आईसोबत त्याचा वाद झाला होता. विजयपूर रोडवरील एसआरपीएफ कॅम्पजवळील समर्थ सोसायटीत तो राहायला होता. वादानंतर तो त्याच्या खोलीत गेला. दुसऱ्या दिवशी सरकार नोकरदार असलेले त्याचे वडील श्रीकांत मंद्रुपकर नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले. रात्री वाद केलेला सागर दुपारपर्यंत खोलीतून बाहेर आलेला नव्हता. त्या दिवशी आई घरकाम करून झोपी गेली. पण, सागर अजूनही खाली न आल्याने त्यांनी भावाला बोलावून घेतले आणि सागरची खोली उघडली. त्यावेळी सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. विजापूर नाका पोलिसांना ही बाब समजल्यावर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी बेशुद्धावस्थेत सागरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मृतदेहाची उत्तरीय चाचणीवेळी सागरच्या बनियनमध्ये सुसाईड नोट मिळाली. त्यात त्याने ‘आईला कडक शिक्षा व्हावी, माझ्या आत्महत्येला तिच जबाबदार आहे’ असे नमूद केले होते. या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांत आकस्मित मयत म्हणून नोंद झाली आहे. आता मृताची आई, वडील, बहीण, पत्नी व त्याची मैत्रिण, या सर्वांचे जबाब नोंदविले जाणार आहेत.
पोलिसांनी घेतला ‘पीएम’ रिपोर्ट
ॲड. सागर मंद्रुपकर याच्या मृतदेहाची गुरुवारी (ता. १३) उत्तरीय तपासणी झाली. त्यानंतर पोलिसांना त्याचा अहवालही प्राप्त झाला आहे. त्यात सागरने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.