विकासकामावर देखरेख ठेवण्यासाठी अभियंत्यांचा तुटवडा
esakal November 17, 2025 10:45 AM

विकासकामावर देखरेख ठेवण्यासाठी अभियंत्यांचा तुटवडा
४३९ पदे तातडीने भरण्याची पालिका आयुक्तांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, १६ ः पावसाळ्यानंतर मुंबई महापालिकेने नागरी सुविधांच्या कामांचा धडाका सुरू केला आहे, मात्र सुरू असलेल्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेकडे अभियंत्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे दुय्यम अभियंत्यांची सुमारे ४३९ पदे तातडीने भरावीत, अशी मागणी मुंबई महापालिका आयुक्तांकडे बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने केली आहे.
सध्या मुंबईत पावसाळ्यामुळे प्रलंबित राहिलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. या कामांचे परीक्षण करण्यासाठी अभियंत्यांची कमतरता आहे. त्यामुळे अभियंत्यांचे पदे तातडीने भरावीत, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल, असा इशारा युनियनचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे.
पालिकेतील अभियांत्रिकी विभागातील अभियंत्यांच्या नियुक्ती, पदोन्नती, बदली, सेवाज्येष्ठता याबाबतचे कामकाज पालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाकडून केले जाते. पालिकेतील अभियांत्रिकीच्या संवर्गात कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपप्रमुख अभियंता, पदापर्यंतच्या पदोन्नतीची कार्यवाही केली जाते.
कनिष्ठ अभियंत्यांना दुय्यम अभियंतापदी पदोन्नती देताना एकूण पदांपैकी ५० टक्के कोटा आरक्षित आहे. त्यानुसार सध्या दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदाची ३०७ पदे रिक्त असून, ती पदे खात्यांतर्गत कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नतीने नियुक्त करणे आवश्यक आहे. दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) पदाची १३२ पदे रिक्त असून, ती पदे खात्यांतर्गत कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नतीने नियुक्त करणे आवश्यक आहे.
नगर अभियंता कार्यालयाने एवढ्या मोठ्या प्रमाणात दुय्यम अभियंता पदे रिक्त ठेवून कनिष्ठ अभियंत्यांवर अन्याय होत असून, एकप्रकारे पदोन्नतीचा अधिकार नाकारला असल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय कारभार अभियंत्यांच्या नियमित पदोन्नतीच्या आड येत असून, पदोन्नती वेळेवर न मिळाल्यामूळे अभियंत्यांचे नुकसान होत असल्याचे बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.