जुने नाशिक: बी. डी. भालेकर शाळेसाठी निधी उपलब्ध करून घेऊन प्राथमिक ते माध्यमिक अशी अद्ययावत शाळा सुरू करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले. त्यांच्या आश्वासनानंतर बी. डी. भालेकर शाळा बचाव समितीच्या आंदोलनकर्त्यांनी सलग १६ दिवस सुरू असलेले धरणे आंदोलन स्थगित केले.
बचाव समितीतर्फे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. २५) सायंकाळी त्यांच्या शिष्टमंडळामार्फत आंदोलकांची भेट घेतली. शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख व माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांची भूमिका जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी मंत्री भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
संवादादरम्यान भुसे यांनी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय अधिकृतरित्या रद्द झाल्याचे सांगत, बी. डी. भालेकर शाळा पुन्हा त्याच ठिकाणी अद्यावत स्वरूपात सुरू करण्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे, असे आश्वासन दिले. नाशिक भेटीदरम्यान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनीही बी. डी. भालेकर शाळेसाठी निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती अजय बोरस्ते यांनी दिली.
परिसरात सर्वसामान्य व गरजू कुटुंबे राहतात; त्यांच्या मुलांचे शिक्षण अबाधित राहावे म्हणून निधीअभावी कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असे शिरसाठ यांनी स्पष्ट केले. तसेच यापुढे महापालिका, नगरविकास विभाग व शिक्षण विभागाकडून सर्व पाठपुरावा करण्याचे आश्वासनही बोरस्ते यांनी समितीला दिले.
शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी समाधान व्यक्त करत आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. यावेळी राजू देसले, दीपक डोके, तल्हा शेख, मनोहर पगारे, डॉ. ठकसेन गोराणे, ॲड. प्रभाकर वायचळे, पद्माकर इंगळे, योगेश कापसे, अमर गांगुर्डे, आबा डोके, प्रवीण पगारे, संजय चौरिया, गजू घोडके, गौतम पवार, विजू तेजाळे, दत्तात्रय कोठावदे आदी उपस्थित होते.
Nashik Municipal Election : नाशिक महापालिका निवडणुकीचा युती-आघाडीचा 'गुंता' कायम; राजकीय पक्षांच्या धोरणात मोठा फरकशाळेसाठी निधी उभारणार
नगरविकास विभागाकडून शाळेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, कुंभमेळा निधीतूनही विशेष प्रयत्न केले जातील, असेही मंत्री दादा भुसे यांनी यावेळी नमूद केले. पुढील काळात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समितीची बैठक आयोजित करून देण्याचेही भुसे यांनी मान्य केले.