चिंचवड, ता. १६ ः “आपल्या देशातील सुमारे दोनशे जनजातींना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याचा पहिला लढा देणारे थोर क्रांतिकारक म्हणजे भगवान बिरसा मुंडा!”असे मत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.
चिंचवडगाव येथील शाहीर योगेश रंगमंच-अनुदानित आश्रमशाळा, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् चिंचवडगाव येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय गौरव दिवसानिमित्त आयोजित अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि जनजाती कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोशी येथील प्रभारी मंडल अधिकारी बाळकृष्ण साळुंखे होते. व्यासपीठावर ॲड. सतीश गोरडे, सुरेश गुरव, शांताराम इंदोरे, पूनम गुजर व संदीप साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रभुणे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा सविस्तर परिचयही करून दिला.
बाळकृष्ण साळुंखे म्हणाले, “गुरुकुलमधील विद्यार्थी पाहून मला माझे बालपण आठवले. माझे शिक्षणही जनजाती आश्रमशाळेतच झाले.” शांताराम इंदोरे म्हणाले,“फक्त पंचवीस वर्षांचे आयुष्य लाभूनही बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे समाजाने त्यांना ‘भगवान’ ही उपाधी दिली.”
कार्यक्रमाची सुरुवात गुरुकुलम् ते क्रांतितीर्थ चापेकर वाडा आणि पुनः गुरुकुलम् अशा अभिवादन मिरवणुकीने झाली. वाद्यांच्या गजरात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि मान्यवर सहभागी झाले. दीपप्रज्वलन, भारतमाता व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या वेशभूषेत त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.
समारोप वंदेमातरमने झाला. प्रास्ताविक पूनम गुजर यांनी केले. सूत्रसंचालन सतीश अवचार यांनी केले, तर ऋषभ मुथा यांनी आभार मानले. अतुल आडे, हर्षदा धुमाळ, मारोती वाघमारे, शिक्षक वृंद कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले.