Nagpur Crime: मुलाच्या वाढदिवशीच वॉर्ड अध्यक्षाचा खून; यशोधरानगरातील घटना, जुन्या पैशाचा वाद
esakal November 17, 2025 04:45 AM

नागपूर : मुलाचा पहिला वाढदिवस असल्याने त्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या उत्तर नागपुरातील भाजपच्या वार्ड अध्यक्षाचा जुन्या पैशाच्या वादातून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता.१५) विट्टा भट्टी चौक ते कांजी हाऊस चौकादरम्यान घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सचिन शाहू (वय३०, रा. शाहू मोहल्ला, यशोधरानगर) असे मृताचे नाव आहे. त्याला दोन मुले असून एक मुलगा सात तर दुसरा मुलगा एक वर्षाचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनने काही वर्षांपूर्वी ८० हजार रुपये उसने घेतले होते. ते परत देण्यासाठी सोनू सिंग आणि बाबू सिंग हे तगादा लावत होते.

मात्र, सचिन नेहमी टाळाटाळ करायचा. काही दिवसांपूर्वी त्याचे यावरून दोघांसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे दोघेही त्याच्यापासून त्रासले होते. दरम्यान शनिवारी सचिन शाहू याचा लहान मुलगा एक वर्षाचा झाल्याने तो कांजी हाऊस चौकाकडे जात असताना त्याला चार युवकांनी अडविले.

भांडण करीत शस्त्राने वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळवित पसार झाले. पोलिसांना कळताच ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह मेयोत पाठवला. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

खुनाचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

सचिन शाहू याच्यावर शस्त्रांनी वार करून त्याचा खून करण्याचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांकडून त्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Maharashtra Crime : ती असुरक्षितच; साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा, मुंबईमध्ये प्रेयसीला मारत प्रियकराने जीवन संपविले तीन महिन्यांपूर्वी भांडण, आरोपींवर गुन्हा दाखल

सचिन शाहू याने सोनू सिंग आणि बाबू सिंग यांच्याकडून पैसे उसने घेतले होते. ते पैसे परत घेण्यासाठी त्यांनी सचिन शाहू याच्यासोबत ऑगस्टमध्ये गणपती उत्सवादरम्यान भांडण केले होते. तेव्हा यशोधरानगर पोलिस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतरही आरोपी मोकाट असल्याने ही घटना घडल्याची चर्चा परिसरात होती. दरम्यान याप्रकरणी पोलिस निरीक्षक रमेश खुणे यांना संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.