Sheikh Hasina Death Sentenced : भारतात असलेल्या शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, बांग्लादेश सरकारकडे त्यांना अटक करण्याचे कायदेशीर मार्ग कुठले?
GH News November 17, 2025 06:11 PM

बांग्लादेशच्या इंटरनॅशनल कोर्टाने शेख हसीना यांना दोषी ठरवलं आहे. त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने शेख हसीना आणि त्यांचे दोन पूर्व सहकारी माजी गृह मंत्री असदुज्जामान खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक (IGP) चौधरी अब्दुल्ला अल-मामून या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. शेख हसीना सध्या भारतात आहे. मागच्यावर्षी जुलै महिन्यात बांग्लादेशात मोठा विद्रोह झाला. या प्रकरणी कोर्टाने हसीना यांना दोषी ठरवलं आहे. शेख हसीना यांच्यावर निशस्त्र लोकांवर गोळी चालवण्याचा आरोप आहे. कोर्टाने शेख हसीना विरोधात 453 पानी निकाल दिला आहे. हसीना यांचे गुन्हा मानवतेच्या विरोधात आहेत, असं कोर्टाने म्हटलं आहे.

शेख हसीना जानेवारी 2024 पासून हुकूमशाह बनण्याच्या दिशेने अग्रेसर होत्या असं निकालात म्हटलं आहे. जानेवारी 2024 च्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाला चिरडलं. त्यानंतर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवण्याचे आदेश दिले. कोर्टाने अनेक गुन्ह्यात हसीना यांना दोषी मानून शिक्षा सुनावली आहे.

भारताची भूमिका महत्वाची 

आता प्रश्न हा निर्माण होतो की, शेख हसीना यांना दोषी तर ठरवलं. पण पुढे काय होणार?. शेख हसीना बांग्लादेशात तख्तापलट झाल्यापासून भारतात आहेत. त्यामुळे आता या विषयात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो. शेख हसीना यांच्या अटकेसाठी इंटरपोलच्या माध्यमातून बांग्लादेशी सरकार अटकेचं वॉरंट जारी करु शकते.

किती देश इंटरपोलचे सदस्य?

इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायजेशन. ही जगातील मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संस्था आहे. जगातले 194 देश इंटरपोलचे सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्यात इंटरपोलची महत्वाची भूमिका असते. इंटरपोलचे सदस्य असलेले देश पोलीस कारवाईत परस्परांना मदत करतात.

बांग्लादेश काय करेल?

बांग्लादेशी सरकार हसीना यांना पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेईल. इंटरपोल शेख हसीना यांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय नोटीस उदहारणार्थ रेड कॉर्नर नोटीस जारी करु शकतो. बांग्लादेश सरकार इंटरपोलला विनंती करेल की, शेख हसीना यांच्या अटकेसाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करावी.

अटकेची प्रोसेस काय असेल?

सध्या शेख हसीना भारतात आहेत. बांग्लादेश भारताला अधिकृतरित्या सांगेल की, इटंरपोलची नोटीस जारी झाली आहे. त्यासाठी मदत मागेल. त्यानंतर हसीना यांना अटक करुन बांग्लादेशकडे सोपवलं जाऊ शकतं.

भारताने म्हटलं आम्ही अटक करणार नाही, मग…

आता या टप्प्यावर भारताची भूमिका महत्वाची असेल. बांग्लादेश सरकारने वॉरंट बद्दल सांगितल्यानंतर जर भारताने असं म्हटलं की, आम्ही हसीनाला अटक करणार नाही किंवा बांग्लादेशला सोपवणार नाही, तर बांग्लादेश हे प्रकरण संयुक्त राष्ट्रात नेऊ शकते. UN च्या माध्यमातून भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.