हिवाळ्यात केसांच्या समस्या वाढतात, अशा वेळी केसांची निगा राखणं कठीण जातं. या दिवसांत पालेभाज्या या टवटवीत येतात, पालक, मेथी या भाज्या या दिवसांत आहारात समाविष्ट करणं गरजेचं आहे. कारण पालक हे केसांसाठी सुपरफूड ठरतं. पालक केवळ शरीराला ऊर्जा देत नाही तर केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यातील पोषक तत्वे जसे की, लोह, जीवनसत्त्वे अ, क, के आणि फोलेट केसांची मुळे मजबूत करतात आणि टाळूला खोलवर पोषण देतात. ( Spinach Benefits For Hairs )
जर तुम्हाला जास्त केसगळतीचा त्रास होत असेल तर पालक हा एक स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. केसांसाठी पालकाचा वापर कसा करावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी काही सोपे उपाय जाणून घेऊया… हे उपाय केल्याने काही दिवसातच तुम्हाला चांगला फरक जाणवेल.
पालकमधील लोह आणि फोलेट केसांच्या मुळांमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह वाढवतात ज्यामुळे केसगळती थांबते आणि नवीन केस फुटतात. पालकातील जीवनसत्त्वे अ आणि कमुळे टाळूमध्ये सेबम उत्पादन वाढते, ज्यामुळे केस मॉइश्चरायझ राहतात आणि कोरडेपणा कमी होतो. पालकातील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सपासून केसांचं होणारं नुकसान कमी करतात, ज्यामुळे अकाली केस पांढरे होत नाहीत.
पालक असा करा वापर:
तुम्ही तुमच्या हेअरकेअर रुटीनमध्ये पालकाचा समावेश दोन प्रकारे करू शकता. जसे की,
केसांचा मुखवटा
पालकांचा हेअर मास्क बनवण्यासाठी पालकाची पाने मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात १ चमचा नारळ तेल किंवा ऑलिव्ह तेल घाला. ही पेस्ट टाळूला पूर्णपणे लावा आणि ३० मिनिटांनी शाम्पूने धुवा. यामुळे टाळूला खोलवर पोषण मिळते आणि केस मऊ होतात.
रिकाम्या पोटी पालकाचा रस प्या
जर तुम्हाला तुमचे केस आतून मजबूत करायचे असतील तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी पालकाचा रस पिण्यास सुरुवात करा. त्यात काही थेंब लिंबाचा रस घातल्यास फायदा होतो. यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारते आणि नैसर्गिकरित्या केसांची वाढ होण्यास मदत होते.
ही काळजी घ्या
जास्त पालकाचे सेवन केल्याने शरीरात ऑक्सॅलिक अॅसिड वाढू शकते. ज्यामुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण रोखले जाते, त्यामुळे ते कमी प्रमाणात सेवन करा. याशिवाय पालकांचा हेअर मास्क टाळूवर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा यामुळे कोणतीही ऍलर्जी होणार नाही.