रब्बी हंगामाचे बळीराजाला वेध
esakal November 18, 2025 05:45 AM

वाणगाव, ता. १७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात रब्बी हंगामात मिरची, ढोबळी मिरची, शिमला मिरचीसह कडधान्यवर्गीय पिकांमध्ये वाल, चवळी, हरभरा, भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, वांगी, वेलवर्गीय पिकांमध्ये दुधी भोपळा, शिराळे, दोडका, तसेच कोबीवर्गीय पिके, फुलशेतीसह तेलवर्गीय पिकांची लागवड केली जाते. मागील काही दिवसांपासून अवकाळीचे संकट सुरू असल्याने रब्बीचा हंगाम लांबला आहे. अवकाळीने विश्रांती घेतल्यानंतर आता जिल्ह्यातील शेतकरीवर्ग रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीकडे वळला असून, पूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत.

खरीप हंगामातील भातपिकाची कापणी झाली असून, झोडण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे वेध लागले आहेत. सद्य:स्थितीत १० ते २० टक्क्यांच्या आसपास मिरचीची लागवड झाली आहे, तर काही भागांमध्ये मिरची लागवडीच्या पूर्वतयारीला शेतकरीवर्ग लागला आहे. सद्य:स्थितीत मिरचीची रोपे लागवडी योग्य झाली आहेत, असे मिरची उत्पादक शेतकरी मिलिंद मर्दे यांनी सांगितले आहे.


बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी
भाजीपाला पिकांमध्ये पिवळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा एकरी १५ ते २० या प्रमाणात वापर करावा. शेतकरी बंधूंनी भाजीपाला पिकांचे रोपे नर्सरीमधून खरेदी करताना रोपांना कीटकनाशक व बुरशीनाशकाचे संस्करण न चुकता करावे.
दुकानातून भाजीपाला पिकाचे बियाणे खरेदी करताना बियाण्यास कीटकनाशक व बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केली असल्याची खात्री करावी.

अवकाळीमुळे यंदा रब्बी हंगामास उशिरा सुरुवात होत आहे. थंडीला सुरुवात होण्याअगोदर रब्बी हंगामातील भाजीपाला, तसेच कडधान्य पिकांची लागवड करून घ्यावी. शेताची मशागत करून भाजीपाला पिकांची लागवड केल्यास पिकांच्या जोमदार वाढीस फायदा होतो.
- डॉ. अंकुर ढाणे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, पालघर

यंदा ऐन दिवाळीत अवकाळी बरसल्याने रब्बीचा हंगाम लांबला आहे. सुरुवातीच्या काळात नांगरणी केल्यामुळे त्यावर अवकाळीची बरसात झाल्याने दुबार नांगरणी करण्याची वेळ आली आहे. पावसामुळे यंदा रब्बी हंगाम लांबल्यामुळे मिरची लागवड क्षेत्रातही ३०ते ते ४० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.
- मिलिंद मर्दे, मिरची उत्पादक शेतकरी, डहाणू

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.