वैज्ञानिक जाणिवांसह जादूटोणा कायद्याबद्दल मार्गदर्शन
आश्रमशाळांतील दोन हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ ः जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण पट्ट्यातील गाव, पाडे आणि वाड्या-वस्त्यांमध्ये, विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागात अंधश्रद्धा आजही ठासून भरल्याचे दिसून येते. अंधश्रद्धेला मूठमाती देऊन आदिवासींच्या जीवनात सुगंध पसरविण्यासाठी त्यांच्या मुलांना वैज्ञानिक जाणिवांसह जादूटोणा कायद्याबद्दल मार्गदर्शन व्हावे, याकरिता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले आणि समितीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी खास उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांना आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
राज्यातील अघोरी, जादूटोणा, नरबळी यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सरकारने महाराष्ट्रात नरबळी आणि अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समूळ उच्चाटन करण्याकरिता अधिनियम २०१३ अमलात आणला, मात्र अजूनही या अघोरी प्रथा केल्या जात असल्याच्या घटना वारंवार घडत असतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणाविरोधी कायदा समजून घेतला. या सर्व नियोजनामध्ये शहापूरच्या एकात्मिक प्रकल्प विकास कार्यालयाचे अधिकारी संतोष भोये आणि गजानन गवाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दोनदिवसीय उपक्रम
सरकारच्या आदिवासी आयुक्तालयाच्या परिपत्रकानुसार वैज्ञानिक जाणीव आणि जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून एकात्मिक विकास प्रकल्प शहापूर तालुक्यांतर्गत असलेल्या मोरोशी, खुटल, माळ, मढ आणि सासणे (काचकोली) येथील आदिवासी आश्रमशाळांमध्ये दोनदिवसीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.