Majalgaon News:'रेशन धान्याच्या अवैध साठ्यावर छापा'; माजलगाव तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उडाली खळबळ
esakal November 18, 2025 05:45 AM

माजलगाव: तहसील कार्यालयापासून अगदी जवळच असलेल्या बायपास परिसरात रेशनचा तांदूळ व गहू बिनदिक्कतपणे साठविला जात असल्याचे उघडकीस आले. रात्रीच्या वेळी हे धान्य विविध वाहनांमध्ये भरून इतरत्र पाठविले जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी माजलगावात धडक देत या ठिकाणी छापा मारला. छाप्यात शेकडो कट्ट्यांमध्ये रेशनचे धान्य साठवलेले आढळताच जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ गोडाऊन सील करण्याचे आदेश दिले.

या धाडीमुळे माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. धाड टाकताना शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी या गोडाऊनवर धाड टाकली असता, रेशनचे धान्य मोठ्या प्रमाणात आढळले. त्यांच्या आदेशानुसार गोडाऊन सील करण्यात आले आहे. हे गोडाऊन शेख अमजद शेख इब्राहिम यांच्या मालकीचे आहे. गोडाऊनमध्ये नेमके किती धान्य आहे, हे सील केल्यामुळे अद्याप समजू शकलेले नाही.

- प्राची ठाकूर, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग, माजलगाव

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.