एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार 2025 स्पर्धेत साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि ओमान यांच्यात पार पडला. हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा होता. कारण या सामन्यातील विजयी संघाची थेट उपांत्य फेरीत वर्णी लागणार होती. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना ओमानला बऱ्यापैकी रोखली. ओमानने 20 षटकात 7 गडी गमवून 135 धावा केल्या आणि विजयासाठी 136 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारत सहज गाठेल असं वाटलं होतं. पण भारताची सुरुवात काही खास झाली नाही. आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी ओमानविरुद्धच्या सामन्यात फेल गेला. त्याच्याकडून आक्रमक खेळीची अपेक्षा असताना फटकेबाजीच्या नादात विकेट टाकून बसला. यावेळी त्याचा स्ट्राईक रेटही काही खास नव्हता. असं असलं तरी भारताने हा सामना 4 गडी गमवून 18व्या षटकात पूर्ण केलं. यासह उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे.
वैभव सूर्यवंशीने 13 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 12 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 92.31 चा होता. जय ओडेद्राच्या गोलंदाजीवर आर्यन बिष्टने त्याचा झेल घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे वैभव सूर्यवंशीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 144 धावांची खेळी केली होती. अवघ्या 32 चेंडूत शतक ठोकलं होतं. तर पाकिस्तानविरुद्धही 45 धावांची खेळी केली होती. पण उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या सामन्यात काही बॅट चालली नाही. खरं त्याला एक जीवदानही मिळालं होतं. पण त्याचा फायदा वैभव सूर्यवंशी काही उचलू शकला नाही.
ओमानविरुद्धच्या सामन्यात पहिल्या षटकात तीन चेंडू निर्धाव घालवल्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार मारून खातं खोललं. वैभवला पुढच्याच चेंडूवर जीवदान मिळालं. जय ओडेद्राच्या गोलंदाजीच्या पाचव्या चेंडूवर चौकार मारतान चेंडू हवेत गेला. पण हा झेल काही पकडता आला नाही. युएईविरूद्धच्या सामन्यातही वैभवला जीवदान मिळालं होतं. पण त्या संधीचं त्याने सोनं केलं. पण येथे तसं काही घडलं नाही. या सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीची खूप चर्चा होत होती. मात्र लवकर बाद झाल्याने क्रीडाप्रेमींची निराशा झाली.