थंडीच्या दिवसात तुमच्याही हातापायांची बोटे सुजतात? तर आतापासूनच घ्या अशी काळजी
GH News November 19, 2025 02:10 AM

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी आणि खोकला हे हंगामी आजार अनेकांना होत असतात. परंतु अनेक लोकांना त्यांच्या हातापायांच्या बोटांमध्ये सूज (चिलब्लेन्स) येते. यासोबत तीव्र वेदना होऊ लागतात. अशातच जेव्हा तापमान कमी होते आणि दिवसभर सूर्यप्रकाश नसतो तेव्हा ही समस्या आणखी त्रास देऊ लागते. तर बोटांना सूज येण्याची अनेक कारणे आहेत, जसे की तापमानात होणारे बदल, पाण्यात जास्त काम करणे आणि अनवाणी पायांनी चालणे. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये ही समस्या अनेकांना सतावत असते.

थंडीच्या दिवसांमध्ये हाताच्या व पायांच्या बोटांना सूज येते कारण या दिवसांमध्ये हवामान खूप थंड असते त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे त्वचेवर लालसरपणा देखील येतो आणि जर योग्य काळजी न घेतल्यास फोड येऊ शकतात, खाज सुटणे आणि वेदना देखील होऊ शकतात. चला तर आजच्या लेखात आपण या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतो ते जाणून घेऊयात.

आरामदायी बुटांचा वापर करणे

थंडीच्या दिवसात जास्त वेळा अनवाणी चालल्यानेही तुमच्या पायाच्या बोटांना सूज येऊ शकते. आरामदायी आणि बंद दोन्ही प्रकारचे बुटांचा वापर करा. यामुळे तुमच्या पायाच्या बोटांना थंड हवेचा संपर्क कमी होईल, ज्यामुळे सूज आणि वेदना होण्याची शक्यता कमी होईल.

थंड पाण्यात काम करू नका

हिवाळा सुरू होताच पाणी खूप थंड होते. यामुळे तुम्ही जेव्हा कपडे धुण्यासाठी किंवा भांडी स्वच्छ करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करता तेव्हा सूज येण्याचा धोका देखील वाढू शकतो. अशा परिस्थितीत ताबडतोब थोडं कोमट पाण्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा. जेणे करून थंडीच्या दिवसात ही समस्या त्रास देणार नाही.

शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवा

सूज टाळण्यासाठी योग्य रक्ताभिसरण सुरू राहणे महत्वाचे आहे. तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी दररोज बदाम किंवा ऑलिव्ह ऑइल तेलाने हात व पायांना मालिश करा. कोरड्या त्वचेला सूज, वेदना आणि जखमा होण्याची शक्यता जास्त असते. याव्यतिरिक्त पायांच्या व्यायामामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहील्याने या समस्येपासून आराम मिळतो.

थंड हातपाय लगेच उबदार करण्याची चुक करू नका

हिवाळ्यात आपण अनेकदा बाहेरून येऊन आपले अत्यंत थंड हातपाय गरम करण्याची चूक करतो. थंडीतून थेट उबदार हवेत गेल्याने सूज येण्याचा धोका वाढतो. म्हणून जेव्हा तुमचे हातपाय खूप थंड असतात, तेव्हा ब्लँकेटमध्ये गुंडाळून बसणे चांगले.

तुमचा आहार योग्य ठेवा

तुमच्या हातापायांच्या बोटांना सूज येऊ नये म्हणून थंडीच्या दिवसात निरोगी आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जेव्हा शरीर आतून उबदार असते तेव्हा रक्ताभिसरण सुरळीत राहते. काजू, धान्य, हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे खाणे तूमच्या आरोग्यसाठी फायद्याचे ठरते. हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी आणि लिक्विड आहार घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.