शिवसेनेतील काही नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत खदखद असल्यामुळे शिवसेना मंत्र्यांनी आज बैठकीला दांडी मारल्याची चर्चा होती मात्र यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की कोणाही नाराज आणि कोणतेही मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित नव्हते. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीमुळे अनेक नेते आज बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत,त्यामुळे नाराजीच्या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे बावनकुळे म्हणाले.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीवर भाजपने ऑपरेशन लोटस राबवले जात असल्याचे चर्चा आहे. उल्हासनगर सह अनेक ठिकाणच्या शिंदे सेनेचे काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे समोर आले होते. यावर बावनुकळे म्हणाले की, आधी जे झाले ते झालं आता इथून पुढे महायुतीमधील पक्षाचे नेते एकमेंकांच्या पक्षात प्रवेश करणार नाहीत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरणे आकाराला येत असल्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड अंतर्गत खदखद असल्याचे बोलले जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यानिमित्ताने सुरु असलेली फोडाफोडी ही नाराजीला कारणीभूत असल्याचे समजते.