- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
एका शाळेत पालकांसमोर गप्पा मारण्यासाठी गेलो होतो. तेव्हा एक पालक, शारीरिक शिक्षणाच्या, शिक्षकाला तुम्ही पहिल्या चाचणीचा सिलॅबस अजून दिलेला नाही, असे म्हणत त्यांच्या मागे भुणभूण करत असताना बघायला मिळाल्या. शिक्षणाबद्दलची त्या मातेची कळकळ बघून धन्य वाटले.
दहावीपर्यंतचे शिक्षण संपेपर्यंत सगळं किती सोपं असतं ना! पालक आठवण करून देतात, ‘अरे अभ्यास कर रे’ शिक्षक वेळोवेळी नोट्स देतात, ट्युशनमधले सर प्रश्न सोडवून दाखवतात. अमोल,(प्रातिनिधिक घेतला आहे.) आमचा एक भाच्चा. हुशार. चांगले मार्क मिळवतो. तो बारावीनंतर इंजिनिअरिंगला जातो, तेव्हा चित्र पूर्ण बदललेले असते.
इथे कोणी हात धरून शिकवायला नाही की कोणता धडा वाचायचा, कोणती परीक्षा कधी आहे, हे सांगणारे कुणीही नाही. पहिल्याच सेमिस्टरमध्ये अमोल गोंधळतो. इंडक्शन प्रोग्रॅमनंतर विविध विषयांवरचे प्राध्यापक वर्षाच्या कार्यक्रमांचे वर्णन करून निघून जातात. कुणीतरी बाहेरचा, प्रमुख पाहुणा किंवा थोर उद्योगपती येऊन इंजिनिअरिंग म्हणजे काय?
उद्योजकता एक करिअर या व अशा समकालीन विषयावर भाषणे देऊन जातात. पहिल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या मनातील गुंता अजूनच वाढतो, भावना अजूनच गोंधळलेल्या अवस्थेत जातात. कधी-कधी तर खूपच एकटे वाटायला लागते. ‘आता काय करायचं?’ हा प्रश्न दररोज मनात येतो. एके दिवशी अमोलला गणिताचा एक कठीण प्रॉब्लेम समोर येतो.
हे मॅथेमॅटिक्स नावाचे प्रकरण पहिली तीन सेमिस्टरपर्यंत पुरते. बहुतेक सर्व विद्यार्थी विनोदाने त्यांना ‘तीन यम’ (Maths चा M) असेच म्हणतात. मित्र अमोलला म्हणतात, ‘राहू दे, पुढे बघू. ऑप्शनला टाकू.’’ पण काय काय ऑप्शनला टाकायचे ना? त्याने ठरवलं, ‘आज हा प्रश्न स्वतःच समजून घ्यायचा.’ त्याने पुस्तकं, व्हिडिओ, नोट्स सगळं शोधले. अपयशही आलं, परंतु शेवटी प्रश्न सुटला.
त्याच क्षणी राहुलला एक मोठा धडा मिळाला. शिकवलेलं संपतं, परंतु स्वतः शिकण्याची क्षमता आयुष्यभर टिकते. स्वआकलन हा साक्षात्काराचा क्षण ठरतो. पॉइंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. जणू अमोलच्या आयुष्यातील पुनरुत्थानाचा प्रसंग ठरतो. त्या दिवसानंतर अमोलने ‘सेल्फ स्टडी’ आपल्या जीवनाचा भाग बनवला.
त्याला फक्त विषय समजू लागला नाही, तर तो विचार करायला, शंका विचारायला, शोध घ्यायला शिकला. पदव्युत्तर शिक्षण घेतले. ‘पीएचडी’ची तयारी करतोय. एका संशोधन संस्थेत काम करतो आहे. तो म्हणतो, ‘महाविद्यालयाने दिशा दिली, परंतु चालायला मीच शिकलो.’ असे अमोल कोणत्याही अभ्यासक्रमाचे असू शकतात. स्पर्धा परीक्षांसाठी तर हीच स्वयं अध्ययनाची पद्धत उपयुक्त सिद्ध झालेली आहे.
आजचं जग झपाट्याने बदलतंय. नव्या तंत्रज्ञानाने दररोज नवी दारे उघडत आहेत. या काळात फक्त शिकवलेलं पुरेसं नाही. स्वयं-अध्ययन, स्वयंसमज आणि स्वप्रेरणा हीच भविष्यातील यशाची तीन सूत्र आहेत.
शिक्षक शिकवतात, पालक मार्गदर्शन करतात, परंतु खरी वाटचाल आपल्यालाच करायची असते. अगदी बालवाडीपासून विद्यार्थ्यांना स्वतःला प्रकल्प करू द्यात. स्वतःच स्वतःसाठी शिकण्याची सवय लावा; कारण भविष्याच्या वाटेवर हीच सवय मोठी गुरुकिल्ली ठरणार आहे.