ऋतुराज गायकवाड याने इंडिया ए टीमला दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून दिला. ऋतुराज दोन्ही सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला. ऋतुराजने पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक आणि दुसऱ्या सामन्यात अर्धशतक केलं. ऋतुराजच्या या खेळीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. भारताने सलग दुसऱ्या विजयासह मालिका जिंकली. भारताने 3 सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली होती. त्यामुळे भारताला तिसरा आणि अंतिम सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप करण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या सामन्यात लाज राखली. दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत भारत दौऱ्याचा शेवट गोड केला.
उभयसंघातील तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट सामन्याचं आयोजन हे राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात भारतासमोर 326 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताचा डाव हा 50 ओव्हरआधीच आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताला 5 बॉलआधी ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेने भारताला 252 धावांवर रोखलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे मालिकेतील शेवटचा सामना 73 धावांनी जिंकला.
ओपनर आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाडला तिसर्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. ऋतुराजने 25 धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि कॅप्टन तिलक वर्मा या दोघांनी प्रत्येकी 11-11 धावा जोडल्या. ईशान किशन आणि आयुष बदोनी या दोघांनी अर्धशतक केलं. या दोघांच्या खेळीमुळे भारताला विजयाची आशा होती. मात्र हे दोघे आऊट झाल्यानंतर भारताच्या विजयाची आशा मावळली.
भारतासाठी आयुष बदोनी याने सर्वाधिक धावा केल्या. आयुषने 66 बॉलमध्ये 8 फोरसह 66 रन्स केल्या. ईशान किशन याने 2 सिक्स आणि 3 फोरसह 67 बॉलमध्ये 53 रन्स केल्या. हर्षित राणा बेभरोशाचा ठरला. हर्षित राणा पहिल्याच बॉलवर आऊट झाला. मानव सुथार आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी 23 धावा केल्या. मात्र दोघे अपेक्षित धावगतीने धावा करण्यात अपयशी ठरले.
त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. लुहान ड्री प्रिटोयरियस आणि रिवाल्डो मूनसामी या सलामी जोडीने शतक झळकावलं. प्रिटोरियस याने सर्वाधिक 123 धावा केल्या. तर मूनसामीने 107 धावांची खेळी केली. तर इतरांनीही योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 325 धावांपर्यंत मजल मारली. भारतासाठी खलील अहमद, प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.