New Zealand vs West Indies, 2nd ODI: न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून न्यूझीलंडने मालिका खिशात घातली आहे. यासह न्यूझीलंडला त्यांच्या भूमीत वनडे मालिकेत पराभूत करणं कठीण असल्याचं अधोरेखित होत असल्याचं दिसत आहे. न्यूझीलंडने सलग 11वी वनडे मालिका जिंकली आहे. खरं तर वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा वनडे सामना न्यूझीलंडच्या हातून गेलेलाच होता. पण पावसामुळे या सामन्याचं चित्र पालटलं. वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना 34 षटकात 247 धावा केल्या. यात कर्णधार शे होपने 69 चेंडूत नाबाद 109 धावांची खेळी केली. पण त्याच्या शतकी खेळीवर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने पाणी टाकलं. सँटरनरने शेवटी फलंदाजीला येत 15 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजच्या घशातून विजयाचा घास खेचून आणला.
नेपियरमध्ये पावसामुले सामना उशिराने सुरु झाला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार 34 षटकांचा सामना केला गेला. कर्णधार शे होपच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने 247 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना किवी संघ डगमगला. पहिल्या विकेटसाठी डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रने 106 धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर विकेट पडल्या आणि धावगतीवर परिणाम झाला. विल यंग 11 धावा करून बाद झाला. चॅपमॅनला खातंही खोलता आलं नाही. कॉनवे 90 धावांवर बाद झाला.
न्यूझीलंडला 12 चेंडूत 22 धावांची आवश्यकता होता. सँटनर फलंदाजीला समोर होता. त्याने शामरच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर दुसर्या चेंडूवर षटकार मारला आणि 10 चेंडूत 12 दावा अशी स्थिती आणली. त्यानंतर पुढच्या चार चेंडूवर चार धावा आल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात 8 धावांची गरज होती. सँटनरने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आणि जेडन सील्सला स्ट्राईक दिली. त्याने नो बॉलवर चौकार मारला. त्यामुळे दुसरा चेंडू फ्री हीट मिळाला आणि 5 धावाही आल्या. पुढच्या दोन चेंडूवर एक एक धाव काढली आणि विजयश्री खेचून आणला.