Anmol Bishnoi: अखेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला भारतात आणलं; NIA कडून अटक, कसा बनला भारतातील 'मोस्ट वॉन्टेड'?
esakal November 19, 2025 11:45 PM

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी गँगस्टर अनमोल बिश्नोईचे आज अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले. तो आज दिल्ली विमानतळावर पोहोचला. जिथे त्याला एनआयएने अटक केली. त्याच विमानाने इतर हद्दपार झालेल्यांनाही भारतात आणण्यात आले.

२०२२ पासून अमेरिकेत राहत असलेला अनमोल बिश्नोई हा त्याचा तुरुंगात असलेला भाऊ लॉरेन्स बिश्नोई चालवत असलेल्या दहशतवादी सिंडिकेटमधील १९ वा आरोपी होता. एनआयएने मार्च २०२३ मध्ये त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. एनआयएच्या तपासानुसार, २०२० ते २०२३ दरम्यान अनेक दहशतवादी हल्ले करण्यात अनमोलने गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांना थेट मदत केली. तो नियोजनात सहभागी होता. भारतातील विविध घटनांच्या कटात महत्त्वाची भूमिका बजावली.

Viral Story: चक्क RAW संचालक बनून लग्न! महिला न्यायाधीशाला फसवंल... पण सत्य बाहेर आलं तेव्हा सर्वच थक्क!

अनमोल अमेरिकेतून बिश्नोई टोळीचे नेटवर्क व्यवस्थापित करत असे. तो टोळीच्या शूटर्स आणि ग्राउंड ऑपरेटिव्हना निर्देशित करत असे. त्यांना ठिकाणे आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवत असे. तपासात असेही उघड झाले की, अनमोल परदेशातून भारतात पैसे उकळत असे. हे करण्यासाठी, त्याने इतर गुंडांची मदत घेतली आणि टोळीच्या कारवायांचे समन्वय साधले.

अनमोल बिश्नोई हा अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये हवा आहे. त्याला कोणत्या एजन्सीला ताब्यात घ्यायचे हे केंद्र सरकार ठरवेल. महाराष्ट्र पोलिसांच्याएका अधिकाऱ्याने सांगितले की, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेतही अनमोल हवा आहे. मुंबई पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार आहेत. अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. बनावट रशियन पासपोर्ट देखील सापडला आहे.

मुंबई पोलिसांनी अनमोलच्या प्रत्यार्पणासाठी दोन प्रस्ताव पाठवले होते. देशभरात त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, एजन्सींना माहिती मिळाली की अमेरिका आणि कॅनडा दरम्यान वारंवार आपले स्थान बदलणारा अनमोल कॅनडामध्ये ताब्यात घेण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांवर बनवलेला रशियन पासपोर्ट त्याच्याकडे असल्याचेही वृत्त आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याला अमेरिकेतही ताब्यात घेण्यात आले होते. एनआयएने त्याच्या डोक्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

२०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्याकांडातही अनमोल बिश्नोईचे नाव समोर आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांनी सांगितले की, त्यांना अनमोलला भारतात हद्दपार केले जात असल्याची माहिती देणारा ईमेल मिळाला आहे. झीशान म्हणाले की, अनमोलला भारतात आणून त्याच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा द्यावी.

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी माजी मंत्री बाबा सिद्दीकींची वांद्रे येथील त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात मकोकाच्या कडक तरतुदी देखील लागू केल्या आहेत. या प्रकरणात एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अनमोल बिश्नोई, शुभम लोणकर आणि झीशान मोहम्मद अख्तर यांना आतापर्यंत हवे होते. आता अनमोल अमेरिकेतून परतल्यानंतर या सर्व प्रकरणांचा तपास अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.