वाडा : तालुक्यातील कोने गावाच्या हद्दीत असलेल्या ' भगवान पुष्पदंत इंडस्ट्रीयल प्रा.लिमिटेड या फोमचे उत्पादन करणा-या कंपनीला आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत संपूर्ण कंपनी बेचिराख झाली.बाॅयलरचा स्फोट होऊन ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून या आगीत दोन कामगार गंभीर रित्या जखमी झाले आहेत.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.यात सुमारे 23 कोंटीचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
अजय रावत ( 35) व राणी रावत (32)अशी गंभीर जखमी झालेल्या कामगारांची नावे असून त्याच्यावर वाड्यातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोने येथे ' भगवान पुष्पदंत इंडस्ट्रीयल प्रा.लिमिटेड ' ही कंपनी असून या कंपनीत फोमचे उत्पादन केले जाते.आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास अजय हा कामगार बाॅयलर जवळ काम करीत असताना अचानक बाॅयलरचा स्फोट झाला आणि आग पसरली.बघता बघता आग सर्वत्र पसरली.आग लागताच कंपनीत एकच पळापळ सुरू झाली.
Pune Crime : हडपसरमध्ये चार पिस्तुलांसह काडतुसे जप्त, पोलिसांकडून तिघांना अटक; अनेक गंभीर गुन्हे दाखलबाॅयलर जवळ असलेल्या अजय व त्याची पत्नी राणी हे दोघे कामगार गंभीररित्या भाजले गेले त्यांना इतर कामगारांनी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.फोम हा ज्वलनशील असल्याने बघता बघता संपूर्ण कंपनीला आगीने वेढले.चार तास आगीने रौद्ररूप धारण केले होते वाडा अग्निशमन दलाचा एक बंब काही काळातच पोहचला मात्र आग एवढी भयंकर होती की ते आग विझवण्यात अयशस्वी झाले त्यानंतर पालघर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले ते दोन अडीच तासांत जागेवर पोहचले मात्र आगीचे रौद्ररूप सुरूच होते.वाडा व पालघर अग्निशमन दलाच्या जवानांनी चार ते साडेचार तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत कंपनी बेचिराख झाली होती.
या आगीत संपूर्ण इमारत, कच्चा माल, पक्का माल ,यंत्र सामुग्री असे सर्व जळून खाक झाले असून अंदाजे 23 कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती कंपनीचे मालक भरत जैन यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवंत चौधरी हे घटनास्थळी तत्काळ दाखल होत इतर कामगारांना कंपनीतून बाहेर काढले त्यानंतर आजूबाजूला असलेल्या कंपन्यांनाही सुरक्षिततेबाबत सूचना केल्या.आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनीही विशेष प्रयत्न केले आजूबाजूच्या गावात असलेल्या टॅकर चालकांना दूरध्वनीवरून पाचारण केले.