भंडारा येथे धक्कादायक घटना घडली. कॅनरा बँकेत मोठी चोरी झाली आणि एकच खळबळ उडाली. बँकेत चोरी झाल्याची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि ग्राहकांनी धस्ती घेतली. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला मॉइल्सच्या कॅनरा बँकेत चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणात सूत्रे हलवली. अवघ्या काही तासात बॅंकेतील रोकडवर डल्ला मारणारा चोर पोलिसांच्या ताब्यात आला. हैराण करणारे म्हणजे चक्क बॅंकेचा सहाय्यक मॅनेजरच चोर निघाला. सहाय्यक मॅनेजरनेच बॅंकेत चोरी केली आणि दरोडा पडला दर्शवले.
बँकेतील रोकड बँकेच्या सहाय्यक मॅनेजरने लुटल्याची धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी चिखला मॉइल्स येथील कॅनरा बँकेचे सहाय्यक मॅनेजर मयूर नेपाले (32) याला अटक केली आहे. ऑनलाइन गेमिंग, शेअर मार्केट ट्रेडिंगचं कर्ज, यासोबत अन्य असे लाखो रुपयांचे कर्ज असल्याने ते परतफेड करण्यासाठी सहाय्यक मॅनेजरनेच बँक लुटली. त्याच्याकडून पोलिसांनी 96 लाखांची रोकड जप्त केली आहे.
या चोरीच्या रक्कमेतून दुचाकी आणि चारचाकी वाहनासह मोबाईल व अन्य असा 1 कोटी 7 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. कॅनरा बँकेत सहाय्यक बँक मॅनेजर असलेल्या मयूर नेपाले याला ऑनलाइन गेमिंग, शेअर मार्केट ट्रेडिंगचा छंद होता. तो सतत शेअर मार्केट आणि ऑनलाइन गेमिंगसाठी कर्ज घेत होता आणि कर्जाचा मोठा डोंगर त्याच्यावर झाला.
स्वतःच्या अंगावर झालेले कर्ज मयूर नेपाले याने स्वतःच्या वडिलांची 80 लाखांची FD आणि बँकेतील अन्य दोन ग्राहकांची 32 लाखांची अशा तीन FD तोडून रक्कम उचल केली होती. यासोबतचं मयूर नेपाले याच्यावर घेतलेल्या कारचं कर्ज, मित्रमंडळींकडून घेतलेले 20 लाखांचे हातउसने कर्ज, शैक्षणिक कर्ज, पेटीएमचं कर्ज असं सुमारे 90 लाखांचं कर्ज होते. शेवटी सर्व कर्ज फेडण्यासाठी त्याने मोठा प्लॅन रचला.
बँकेची चावी मयूर याच्याकडे असल्याने आणि स्ट्रॉंग रूमची जबाबदारीही त्याच्यावर असल्याने त्याने जाणीवपूर्वक लॉक केलं नव्हतं. पहाटेच्या सुमारास त्याच्या दुचाकीने येऊन बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर काढला. त्यानंतर मोठ्या बॅगमध्ये ही रक्कम भरून दुचाकीनेच नागपूरला गेला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास केला जातोय.