नवी दिल्ली : अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढत आहेत. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं रिलायन्स ग्रुपशी संबंधित 1400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. आतापर्यंत ईडीनं अनिल अंबानी यांची एकूण 9000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
ईडीनं नव्या आदेशान्वये अनिल अंबानी ग्रुप ऑफ कंपनीजशी संबंधित 1400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीनं यापूर्वी 7500 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. मुकेश अंबानी यांच्या नव्यानं जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता नवी मुंबईचेन्नई, पुणे आणि भुवनेश्वर येथील आहेत.
31 ऑक्टोबर 2025 ला जारी करण्यात आलेल्या 5(1) च्या आदेशानुसार रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडकडून जमा केलेल्या सार्वजनिक पैशांचा कथित दुरुपयोग केल्या प्रकरणी यापूर्वी रिलायन्स ग्रुपच्या 40 हून अधिक संपत्ती अस्थायी रुपयात जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबईतील वांद्रे पश्चिम, पाली हिल येथील एका घराचा समावेश होता.
अनिल अंबानी रिलायन्स ग्रुपकडून ईडीकडून होत असलेल्या कारवाईच्या संदर्भात स्पष्टीकरण जारी केलं जात आहे. ईडीच्या कारवाईमुळं उद्योगावर परिणाम झाला नसल्याचं सांगितलं जातंय. कंपनीनं काही दिवसांपूर्वी स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार ईडीनं जप्त केलेली संपत्ती रिलायन्स कम्युनिकेशन्सची आहे. ही कंपनी 6 वर्षानंतर सीआयआरपी तून जात आहे. रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्राच्या भविष्यावर कोणता परिणाम होणार नाही. ईडीनं अनिल अंबानी यांना चौकशीसाठी 14 नोव्हेंबरला कार्यालयात बोलावलं होतं.
आरएचएफएल आणि आरसीएफएलद्वारे जमा करण्यात आलेली सार्वजनिक रक्कम अनिल अंबानींशी संबंधित संस्थांमध्ये वर्ग करत मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपानं अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या आहेत.
अनिल अंबनी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा शेअर 4.92 टक्क्यांच्या घसरणीसह 170.53 रुपयांवर पोहोचला आहे. तर, रिलायन्स पॉवरचा शेअर 1.53 टक्क्यांच्या घसरणीसह 39.32 रुपयांवर पोहोचला आहे. ईडीच्या नव्या कारवाईनंतर रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरवर काय परिणाम होतो ते पाहावं लागेल.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा