जळगाव: एकमेकांना काका- पुतण्याचे नाते लावणारे मित्र येथेच्छ दारू प्यायल्यानंतर तर्रर्र झाले. यातील पुतण्याची दारू उतरण्यासाठी काकाने बंधारा वजा तलावाच्या पाण्यात पुतण्याला नेले. मात्र, दारूच्या नशेत असलेला पुतण्या गटांगळ्या खात बुडू लागला. त्याला वाचविण्याऐवजी काका तसेच सोडून निघून गेला.
मात्र, हा सर्व प्रकार एका वृद्धाने पाहिला. त्यामुळे पुतण्याचा मृतदेह सापडल्यानंतर हा वृद्ध आपले नाव सांगेल, या भीतीने काकाने प्रत्यक्षदर्शीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरखेड (ता. भडगाव) येथील घटनेतून पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे. याप्रकरणी मारेकरी काकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
याबाबत माहिती अशी, पिंपरखेड (ता. भडगाव) येथे वाल्मिक संजय ह्याळिंगे (वय २७) हा शुक्रवारी (ता. १४) गावाजवळील नाल्याच्या पाण्यात बुडून मृतावस्थेत आढळून आला होता. त्यानंतर रविवारी (ता. १६) सकाळी आठला गावातीलच नारायण रामदास ह्याळिंगे (वय ५३) यांचाही मृतदेह त्याच ठिकाणी तरंगताना दिसून आला. या दोघांचे मृत्यू संशयास्पद व घातपात असल्याचे सांगत ग्रामस्थांनी एरंडोल- येवला महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते.
गुन्हे शाखेकडून दखल
दोन दिवसांच्या अंतराने दोन मृतदेह तलावातून सापडल्यानंतर स्वत: पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह गुन्हे शाखेने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आणि त्यादृष्टीने तपासाला सुरवात केली.
मयत नारायण ह्याळिंगे यांच्या डोक्यावर जबर दुखापत करुन त्यांना पाण्यात फेकल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, त्यांचे पथक आणि भडगावचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा व सहकाऱ्यांनी तपास सुरु केला.
साध्या वेशातील पोलिसांनी गुप्तपणे माहिती घेणे सुरु केले. अशातच मयत वृद्धाचे घर तलावापासून अवघ्या काही मीटरच्या अंतरावरच असल्याने पोलिसही चक्रावले. कुठलाच सुगावा लागत नसताना आणि माहिती घेण्यामध्ये दोन्ही घटनांची सरमिसळ होत असल्याने गोंधळाची परिस्थिती वाढत होती. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांनी दोन्ही घटना वाटून घेतल्या. प्राप्त माहिती एकमेकांना शेअर केली. त्यानंतर गुन्ह्याचा उलगडा करणारा सुगावा सापडला. पहिल्या मृत्यूच्या घटनेने हा सर्व प्रकार घडल्याचे व त्या मागील संशयिताचे नाव समोर येताच त्याची चौकशी सुरु केली आणि गुन्हा उघडकीस आला.
असा मिळाला सुगावा
वाल्मिक ह्याळिंगे (वय २७) हा ज्यावेळी बेपत्ता झाला होता, त्याठिकाणी नारायण ह्याळिंगे असल्याचे पोलिस तपासात समजून आले. ‘मंगळवारी (ता. ११) मध्यरात्री अडीचच्या सुमारास दारुच्या नशेत वालू (वाल्मिक) असे एक जण ओरडत होता. नंतर तो एकासोबत पाण्यात झेपत होता, पण त्याच्यासोबत कोण होता हे मला सांगता येणार नाही’ असे नारायण ह्याळिंगे यांनी ग्रामस्थांना सांगितले होते.
त्यानंतर त्याच रात्री झोपेतून नारायण ह्याळिंगे बेपत्ता झाले व दोन दिवसांनी रविवारी (ता. १६) त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या डोक्याला मारहाणीच्या जखमा आढळल्यानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करुन मयत वाल्मिक सोबत जो होता, त्या विनोद प्रकाश पाटील (वय ४६) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. भडगाव पोलिसांनी त्याला खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत घटनाक्रम सांगितला.
...म्हणून केला खून
विनोद प्रकाश पाटील (वय ४६) आणि वाल्मीक संजय ह्याळिंगे यांच्यात वयाचा निम्मे फरक असून, दोघेही सोबत कामधंदा करून रात्री दररोज एकत्र दारू प्यायचे. थंडीमुळे सर्व गावी झोपी गेल्यानंतर दोघे हातभट्टी व देशीची दारू प्यायले. तलावाजवळ आल्यानंतर राखेत लोळले. दारू डोक्यात गेल्याने वाल्मीकने डोळे फिरवून दिले.
Malegaon Crime : मालेगावात गुन्हेगारीवर पोलिसांचा ‘कोंबिंग ऑपरेशन’चा बडगा; १८ दिवसांत २० आरोपींना जेरबंद, अवैध शस्त्रसाठा जप्तमात्र, तो जिवंत होता. अंगावर पाणी टाकले तर दारुड्या शुद्धीवर येतो, असे विनोदला वाटल्याने त्याने वाल्मीकला तलावात नेले. दोघांनाही पोहता येत असले तरी वाल्मीक नशेत असल्याने पाण्यात उतरताच गटांगळ्या खाऊ लागला. विनोदला त्याला पाण्याबाहेर काढता आले नाही. त्यामुळे तो तसाच त्याला सोडून निघून गेला. ही सर्व घटना जवळच झोपलेल्या नारायण ह्याळिंगे वृद्धाने पाहिली होती. हे विनोदला माहीत झाल्यानंतर आपला पहिला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून त्याने नारायण ह्याळिंगे यांच्या डोक्यावर जबर हल्ला करून त्यांनाही पाण्यात फेकून दिल्याची कबुली पोलिसांना दिली.