नारायणगाव, ता. २० : वयोवृद्ध जन्मदात्या मातापित्यांचे पालन पोषण करणाऱ्या मुलाला न्यायालयाने दणका दिला आहे. या प्रकरणी नारायणगाव (ता. जुन्नर) पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावरून दोन मुलांपैकी एकावर जुन्नर न्यायालयाने तीन महिने सश्रम कारावास व पाच हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली.
या प्रकरणी लक्ष्मण विठ्ठल गाडगे (वय ४९, रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) यांना जुन्नर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
निमगाव सावा येथील विठ्ठल बाबूराव गाडगे (वय ८०) यांना लक्ष्मण व सुनील (वय ५३, दोघेही रा. निमगाव सावा) ही दोन मुले आहेत. विठ्ठल हे वयोवृद्ध पत्नीसह निमगाव सावा येथेच राहत आहेत. ते स्वतःचा चरितार्थ स्वतःच करत आहेत. मात्र, त्यांची दोन्ही मुले त्यांचे घर व शेतजमीन या मालमत्तेचा उपभोग घेत आहेत. असे असतानादेखील दोन्ही मुले माझा व माझ्या पत्नीचा सांभाळ करत नाहीत, अशी तक्रार त्यांनी १३ मे २०२३ रोजी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी दोन्ही मुलांवर ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण कल्याण कायदा २००७चे कलम २४प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. पोलिस हवालदार एस. एम. कोकणे यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र जुन्नर न्यायालयात दाखल केले होते. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र व गुन्ह्याच्या कागदपत्रांचे अवलोकन करून जुन्नर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी आरोपी लक्ष्मण गाडगे याला शिक्षा सुनावली.