नगराध्यक्ष उमेदवारांनी मांडले व्हिजन
esakal November 21, 2025 03:45 AM

पालघर, ता. २० : नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत, मात्र खरी लढत भाजपचे कैलास म्हात्रे, शिवसेनेचे उत्तम घरत आणि महाविकास आघाडीचे उत्तम पिंपळे या उमेदवारांमध्ये होण्याची शक्यता आहे. या तिन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत पालघर नगर परिषदेमधील भ्रष्टाचार, पाणीपुरवठा आणि वेगवेगळ्या समस्यांवरून एकमेकांवर निशाणा साधला आहे. नगराध्यक्षपदाचा प्रत्येक उमेदवार पालघर शहरवासीयांना आश्वासने दाखवत आहे. या तीन प्रमुख उमेदवारांनी शहरातील जनतेला हाक देत विविध आश्वासने दिली आहेत. नगराध्यक्षपद यंदा जनतेतून निवडले जाणार असल्याने या तिन्ही उमेदवारांमध्ये ‘काटे की टक्कर’ होण्याची चिन्हे आहेत.

शाश्वत विकास आणि पारदर्शक कारभार करणार
भाजपने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवणार आहे. शहरातील पाणी समस्या व इतर महत्त्वपूर्ण समस्या आजही कायम आहेत. त्यामुळे नागरिकांनी मला निवडून दिल्यास शहरी सुविधांसह नगरपालिकेचा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार देणार आहे. जनतेसमोर नगर परिषदेच्या शाश्वत विकासाचे व्हिजन घेऊन जाणार आहोत. त्यामुळे जनता आमच्या पाठिशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास भाजपचे कैलास म्हात्रे यांना आहे.

भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार
गेले अनेक वर्षे पालघर नगर परिषदेत झालेला भ्रष्टाचार, नागरी समस्या आजही कायम आहेत. निवडून आल्यानंतर भ्रष्टाचारमुक्त नगर परिषद करणार असून, ही लढाई चांगले शहर घडवण्यासाठी लढत आहे. शहरातील पाणीटंचाई दूर करायची असून, खड्डेमुक्त रस्ते, कोंडीमुक्त शहर आणि चांगले निरोगी-सुंदर शहर बनवायचे आहे. जनता मला साथ देईल, असे महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम पिंपळे यांनी सांगितले.

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार
पालघर शहरातील जनतेने गेली २५ वर्षे माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी पाचवेळा लोकप्रतिनिधी झालो. याचे सर्व श्रेय जनतेला जाते. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. जनतेच्या मनामध्ये असलेला पालघर घडवायचा असून, त्यासाठी प्रत्यक्षात कृती करून तो सार्थकी ठरवायचा आहे आणि तो मी सिद्ध करून दाखवीन, अशी खात्री शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम घरत यांनी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.