फ्लेमिंगोंचा घरोबा संकटात
esakal November 21, 2025 12:45 PM

फ्लेमिंगोंचा घरोबा संकटात
नवी मुंबईतील कांदळवने कमी झाल्याचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० : शहराला लागून असलेल्या विस्तीर्ण खाडीतील कांदळवनांमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी येतात. पावसाळा संपताच पक्षांचे थवे उरणपासून थेट मुलुंड खाडीपर्यंत विसावतात, मात्र यंदा थंडीला सुरुवात झाली, तर फ्लेमिंगो पक्षी आले नसल्याने पाणथळांबरोबर कांदळवनांची घटलेल्या संख्येमुळे पक्ष्यांचा घरोबाच संकटात आल्याने आगमन लांबणीवर पडल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटी टॅग मिळवून देण्यासाठी नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये मोहिमेचे नेतृत्व केले. या मोहिमेनंतर नवी मुंबई पालिकेने (एनएमएमसी) स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत शहराला मान्यता देण्यासाठी केंद्राकडे अर्ज केला. आश्वासने देऊनही, पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत नवी मुंबईच्या पाणथळ जागांची अधिसूचना सरकार दरबारी आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी काही दिवसांपूर्वी पर्यावरणप्रेमींनी संवाद साधला होता, परंतु कोणतेही आदेश दिले नसल्याने पर्यावरणप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांचा हिरमोड झाला आहे.
---------------------------------
अधिवास नामशेष होण्याच्या मार्गावर
- उरणमधील दास्तान फाटा, जासई, भेंडखळ, बेलपाडा आणि सावरखर फ्लेमिंगो पक्ष्यांचे अधिवास आहे. या ठिकाणी कांदळवनांखाली पक्ष्यांना खाद्य मिळत असल्याने येथे वास्तव्य करतात. या भागातील २८९ हेक्टर राष्ट्रीय पाणथळ जागी मूल्यांकनमध्ये सूचीबद्ध असूनही असुरक्षित आहे.
- नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरील डीपीएस शाळा तलाव, चाणक्य मरीन अकादमी मागील पाणथळ, नेरूळ, वाशीकडे मोर्चा वळवला आहे. या भागाला फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केले आहे, मात्र येथे मातीचा भराव टाकून भूखंड करून विक्रीचा घाट घातला जात आहे.
------------------------------------------
पाणथळ विकण्याचा घाट
मॅंग्रोव्ह फाउंडेशन आणि बीएनएचएस संस्थांनी फ्लेमिंगोंच्या पाणथळ जागांसाठी काम करतात. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने जागांची देखभाल करण्याची तयारी दर्शविली आहे, मात्र सिडकोने मॅंग्रोव्ह फाउंडेशनचा प्रस्ताव नाकारला असून, विकासयोग्य जमीन म्हणून संबोधले आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः-------------------------------
राज्य सरकारने पाणथळ जागा वाचवण्याची प्रक्रिया जलद करणे गरजेचे आहे. जर दिरंगाई झाली, तर नवी मुंबई ही फक्त नावालाच फ्लेमिंगो सिटी राहील. येणाऱ्या पिढीला महापालिकेने उभारलेले फ्लेमिंगोंचे पुतळेच पाहावे लागतील.
- बी. एन. कुमार, नॅट कनेक्ट फाउंडेशन, संस्थापक
---------------------------
नवी मुंबईचा विकास करणाऱ्या सरकारी संस्थांकडून किनारी पाणथळ जागा गिळंकृत होत आहेत. प्रशासनाने द्रोणागिरीतील पूर नियंत्रणासाठी तयार केलेले तलावदेखील एनएमएसईझेड आणि जेएनपीएला विकण्यात आल्याने पाणथळाच्या जागा नष्ट झाल्या आहेत.
- नंदकुमार पवार, संचालक, सागर शक्ती संस्था

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.