Nashik Airport Expansion : सिंहस्थ कुंभमेळा तयारीला गती! नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता; नवीन टर्मिनल इमारतीसाठी ५५६ कोटींचा खर्च
esakal November 21, 2025 12:45 PM

नाशिक: सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामास कुंभमेळा विकास प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यता दिली. साधारणतः ५५६ कोटी रुपये खर्च करून नवीन टर्मिनल इमारत व अन्य सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. विस्तारीकरणानंतर ताशी प्रवासी वाहतूकक्षमता एक हजारांवर पोहचणार आहे. हे काम मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाची बैठक बुधवारी (ता. १९) दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे पार पडली. या वेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, एनएमआरडीएचे आयुक्त जलज शर्मा, सार्वजनिक बांधकामचे प्रादेशिक अभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व एचएएलचे वरिष्ठ अधिकारी आदी सहभागी झाले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ओझर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (नाशिक विमानतळ) येथे नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल इमारतीच्या बांधकामासह प्रांगण, वाहतूक, पार्किंग, परिसर विकास आदी कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यासाठी ५५६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

कुंभमेळ्याकरिता विमानतळाचे विस्तारीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विस्तारीकरणानंतर प्रवासी वाहतूक क्षमतेमध्ये सध्याच्या ताशी ३०० प्रवासीवरून ही क्षमता एक हजार प्रवाशांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच विमानतळ सुरक्षेसाठी आवश्यक साहित्याचाही आराखड्यात समावेश केला गेला आहे.

विस्तारीकरणाच्या कामासाठी राज्य शासन व एचएएल यांच्यात सामंजस्य करार केला जाईल. त्याकरिता पाठपुरावा करावा. डीजीसीए, बीसीएएस, एरोड्रम इमर्जन्सी मॅनेजमेंट कमिटीकडून आवश्यक ती परवानगी घेण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ. गेडाम यांनी केल्या. तसेच साधुग्राम जागेच्या स्वच्छतेसह पूर्वतयारी संबंधितांनी ठेवावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

Pune News : धुक्यातही विमानांचे सुरक्षित लँडिंग; धुक्यातही विमानसेवा सुरळीत!

असे होणार विस्तारीकरण

नाशिक विमानतळावरून सध्या नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळूर या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध असून, रात्रीची विमान उतरविण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. विस्तारीकरणावेळी १७ हजार ८०० चौरस मीटर क्षेत्रात प्रवासी टर्मिनल उभे राहील. तसेच एक लाख १५ हजार २२० चौरस मीटर क्षेत्रात नवीन ॲप्रॉन असले. त्यामुळे विमान पार्किंग, प्रवासी चढ-उतार, सामान चढविणे आणि उतरविणे आदी सुविधा सुलभ होतील. पार्किंगसाठी २५ हजार चौरस मीटर जागा उपलब्ध होणार असून, पॅसेंजर बोर्डिंग, एरोब्रिज, स्कॅनर आदी सुविधा उपलब्ध होतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.